प्रतिनिधी/ मडगांव
ऑन लाईनमार्फत व्यवस्था करुन ग्राहकांना मुली पुरवणारे प्रकरणाचा खटला मडगावच्या कनिष्ठ न्यायालयाने सत्र न्यायालयात वर्ग केला आहे.
मुळ मध्यप्रदेशातील बेराखेडी जिल्ह्य़ातील पापालिया काला येथील व सध्या आर्लेम येथे राहात असलेला विजयसिंग कुंवरसिंग (37) हा या प्रकरणातील संशयित आरोपी होत. धाड घालून अटक करण्यात आलेल्या या आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 370 (अ) (2) तसेच अनैतिक व्यवसार प्रतिबंध कायद्याच्या 4, 5 व 7 कलमाखाली गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली होती.
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार कोलवा पोलिसांना या संशयित आरोपीच्या गैरकृत्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार केले. ऑन लाईन ठरल्याप्रमाणे कोलवा येथे वाहने पार्क करुन ठेवलेल्या जागी या संशयिताने या बनावट ग्राहकाला येण्यास सांगितले. तेथेच मुली आणलेल्या होत्या.
त्याप्रमाणे पोलीस असलेल्या या बनावट ग्राहकाने ठरल्याप्रमाणे 2 हजार रुपयांच्या दोन नोटा दिल्या. या नोटा दिल्यानंतर काही क्षणातच दबा धरुन बसलेल्या पोलिसानी धाड घातली होती व रंगेहात पकडले होते. त्यानंतर पोलिसांनी वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या मुलींची सुटका केली होती आणि या आरोपीला अटक केली होती.
या मुलींना वेश्याव्यवसायाला लावून त्यातून आलेल्या उत्पन्नावर आरोपी गुजराण करीत होता असाही आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे.
मडगावच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अक्षता काळे यांच्या न्यायालयात या खटल्याची प्राथमीक सुनावणी झाली तेव्हा हा खटला चालविण्याचा अधिकार सत्र न्यायालयाला असल्याने या न्यायालयाने हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्याचा आदेश दिला. या खटल्याबरोबर असलेले सर्व पुरावेही सत्र न्यायालयात वर्ग करण्याचा या न्यायालयाने आदेश दिला.
तोपर्यंत आरोपीला कोलवाळ येथील तुरुंगात पाठवण्यात आलेले आहे.









