प्रतिनिधी / मडगाव :
कोलवा पंचायतीने गुरूवारी रस्त्यांच्या कडेला व्यवसाय करणाऱया गाडय़ांची पाहणी केली. फिरून व्यवसाय करण्यासाठी दिलेल्या परवान्याचा गैरवापर करून हे गाडे कायमचे एकाच जागी उभे करून ठेवण्यात येत असल्याचे आढळून आले असून लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत सचिव अमोल तिळवे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पंचायतीने दिलेला परवान्यांचा गैरवापर करून हे गाडे व्यवसाय करत असल्याचे नजरेस आल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आपणच केली होती व तसा ठरावही घेण्यात आलेला आहे, अशी माहिती सध्याचे पंच व माजी सरपंच मिनीन फर्नांडिस यांनी दिली. रस्त्याच्या कडेला असे गाडे उभे केल्याने रहदारीची कोंडी होते व अपघात होतात, असे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात स्थानिक आमदार चर्चिल आलेमाव, जिल्हाधिकारी तसेच पंचायत संचालकांकडे तक्रारी करण्यात आल्या असल्याचे नजरेस आणून देण्यात आले. जास्त करून ऑम्लेट-पाव गाडय़ांना परवाने देण्यात आले होते. मात्र बहुतेकांनी व्यवसाय बदलले असून काहींनी तर कायमस्वरूपी हॉटेल रस्त्याशेजारी उभारल्याचे या पाहणीत दिसून आलेले आहे. पंचायत मंडळासमोर ही बाब ठेवून यासंदर्भात आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येणार, अशी माहिती पंचायत सचिव तिळवे यांनी दिली.









