वार्ताहर/ रेवोडा
कोलवाळ पंचायतीच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नित्यानंद कांदोळकर यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला आहे. कोलवाळ पंचायतीच्या नवीन सरपंचाची निवड लवकरच होणार असून ही पंचायत माजी आमदार किरण कांदोळकर व विद्यमान आमदार निळकंठ हळर्णकर अशा दोघांनाही स्वतःच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे असे मानले जात आहे.
नऊ सदस्यीय पंचायत मंडळासाठी निवडणूक झाल्यानंतर सर्वप्रथम दशरथ बिचोलकर यांची सरपंचपदी तर रती वारखणकर यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली होती. त्यावेळी माजी आमदार किरण कांदोळकर यांच्या गटाचे वर्चस्व पंचायतीवर प्रस्थपित झाले होते. परंतु काही काळानंतर एका नाटय़मय राजकीय घडामोडीत विद्यमान आमदार निळकंठ हळर्णकर यांच्या गटातील पंचायत सदस्य असल्याचे मानले जाणाऱया अजक्षा फडते, राधिका बांदेकर व मायकल फर्नांडिस यांनी किरण कांदोळकर यांच्या गटातील पंचायत सदस्य नित्यानंद कांदोळकर, बाबनी साळगावकर व शीतल चोडणकर यांच्याशी हातमिळवणी केली. त्यामुळे दशरथ बिचोलकर व रती वारखणकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव संमत होऊन 11 जानेवारी 2019 रोजी नित्यानंद कांदोळकर यांची सरपंचपदी व आजक्षा फडते यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली होती. तेव्हापासून आमदार निळकंठ हळर्णकर यांच्या गटाचे वर्चस्व या पंचायतीवर प्रस्थापित झाले होते.









