वेंगुर्ले /वार्ताहर-
कोलगाव – चव्हाटावाडी येथील महादेव विजय नाईक (50) यांचा मृतदेह आडेली – खुटवळवाडी येथील एका झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला आहे. नाईक हे 4 जानेवारी पासून बेपत्ता होते. याची खबर सावंतवाडी पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, महादेव नाईक हे 4 जानेवारीला दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेले होते. ते माघारी न परतल्याने तसेच नातेवाईक व इतरत्र कोठेही आढळून न आल्याने त्यांची सावंतवाडी पोलिसात बेपत्ताची खबर देण्यात आली होती.
आज मंगळवारी त्यांचा मृतदेह आडेली-खुटवळवाडी येथील झाडास गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. याची माहिती मिळताच वेंगुर्ले पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे या घटनेची माहिती मिळताच आडेलीचे माजी सरपंच प्रकाश गडेकर, शिवसेना ओबीसी सेल तालुकाध्यक्ष नितीन मांजरेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गडेकर यांच्या सहित स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पंचनामा व शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.