पंजाब किंग्सविरुद्ध आज लढत
वृत्तसंस्था/ कोलकाता
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी येथे कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील महत्त्वाच्या सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होत आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी या दोन्ही संघांना सोमवारच्या सामन्यात विजयाची नितांत गरज आहे. दरम्यान विंडीजचा अष्टपैलू सुनील नरेन याची आतापर्यंतची कामगिरी खराब झाल्याने कोलकाता संघासमोर त्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सोमवारच्या सामन्यात अंतिम 11 खेळाडूतील स्थान कायम राखण्यासाठी सुनील नरेनला संघर्ष करावा लागेल.

त्रिनिदादच्या सुनील नरेनने जवळपास एक दशकापेक्षा अधिक कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सुनील नरेनने आयपीएलच्या 12 हंगामातील 158 सामन्यात गोलंदाजी करताना 159 बळी मिळविले आहेत. तर फलंदाजीत त्याने 1039 धावा नोंदविल्या असून त्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. 2012 आणि 2014 साली झालेल्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता संघाला जेतेपद मिळवून देण्यात सुनील नरेनचा वाटा महत्त्वाचा होता. त्याने या दोन आयपीएल हंगामात अनुक्रमे 24 आणि 21 गडी बाद केले होते. पण गेल्या तीन आयपीएल हंगामात सुनील नरेन सूर मिळविण्यासाठी झगडत असल्याचे दिसून येते. कोलकाता नाईट रायडर्सच्या व्यवस्थापन समितीने सुनील नरेनच्या कामगिरीविषयी चिंता व्यक्त केली असून कदाचित 2023 च्या आयपीएल हंगामातील सुनील नरेनला अंतिम 11 खेळाडूत संधी द्यावयाची किंवा नाही याचा निर्णय या संघाचे सीईओ वेंकी म्हैसूर आणि सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर घेऊ शकतील. या वर्षीच्या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाने आतापर्यंत 10 सामन्यांपैकी केवळ चार सामने जिंकले असून ते आता राऊंड रॉबिन फेरीतच बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. कोलकाता संघाचे या स्पर्धेतील आता शेवटचे चार सामने बाकी राहिले आहेत. सुनील नरेनने 10 सामन्यात 8.76 धावांच्या सरासरीने 7 गडी बाद केले आहेत. तर त्याने फलंदाजीत 80 पेक्षा कमी धावा नोंदविल्या आहेत.
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जचा संघ सध्या या स्पर्धेच्या गुणतक्त्यात सातव्या स्थानावर असून या संघाने कोलकाता संघापेक्षा दोन गुण अधिक मिळविले आहेत. दरम्यान हे दोन्ही संघ राऊंड रॉबिन फेरीतच आपले आव्हान संपुष्टात येण्याच्या उंबरठ्यावर आहेत. नितीश राणाच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाला या स्पर्धेतील शेवटच्या चार सामन्यात विजयासाठी दर्जेदार कामगिरी करावीच लागले. दरम्यान या संघातील विंडीजचे दोन खेळाडू सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांच्याबाबत व्यवस्थापन समितीला विचार करावा लागत आहे. टी-20 प्रकारातील आंद्रे रसेल हा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. फर्ग्युसन आणि डेव्हिड विसे हे दोन खेळाडू कोलकाता संघासमोर पर्याय म्हणून आहेत. या संघातील वरुण चक्रवर्तीने बऱ्यापैकी गोलंदाजी केली असून त्याने आतापर्यंत 20.14 धावांच्या सरासरीने 14 गडी बाद केले आहेत. कदाचित सोमवारच्या सामन्यात कोलकाता संघ फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करेल असा अंदाज आहे. कोलकाता संघाचे आता या स्पर्धेतील उर्वरीत 4 सामन्यांपैकी 3 सामने घरच्या मैदानावर तर एक सामना चेन्नईमध्ये होणार आहे. हैदराबाद संघाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात सांघिक कामगिरीच्या जोरावरच कोलकाताने सामना जिंकला होता. मात्र मुंबई संघाविरुद्धच्या सामन्यात नाथन इलिस, सॅम करन आणि अर्षदिप सिंग यांची गोलंदाजी चांगलीच झोडपून काढण्यात आली होती. पंजाबच्या शिखर धवन, लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा यांच्या कामगिरीवरच पंजाबचे यश अवलंबून राहिल. सोमवारचा सामना कोलकातामध्ये होत असल्याने त्याचा लाभ निश्चितच यजमान कोलकाता नाईट रायडर्सला अधिक मिळू शकेल.
संघ – कोलकाता नाईट रायडर्स : नितीश राणा (कर्णधार), रॉय, गुरबाज, वेंकटेश अय्यर, रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, फर्ग्युसन, उमेश यादव, साऊदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकूल रॉय, रिंकू सिंग, एन. जगदीशन, अरोरा, सुयश शर्मा, डेव्हिड विसे, कुलवंत खेजरोलिया, मनदिप सिंग आणि आर्या देसाई.
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, राजपक्षे, जितेश शर्मा, गुरनूरसिंग ब्रार, ऋषी धवन, लिव्हिंगस्टोन, तायडे, अर्शदिप सिंग, बलतेज सिंग, इलिस, रबाडा, राहूल चहर, हरप्रित ब्रार, सॅम करन, सिकंदर रजा, हरप्रित भाटीया, व्ही. कवीरप्पा, मोहित राठी आणि शिवम सिंग.
सामन्याची वेळ – सायं. 7.30 वा.









