सलग पाचवा विजय, ख्रिस गेल-मनदीपची शतकी भागीदारी, जलद गोलंदाज मोहम्मद शमीचे 35 धावात 3 बळी
वृत्तसंस्था/ शारजाह
मोहम्मद शमीचा तिखट मारा आणि ख्रिस गेल-मनदीप सिंग यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर किंग्स इलेव्हन पंजाबने आयपीएल साखळी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला 8 गडी राखून सहज धूळ चारली. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळालेल्या केकेआरला 20 षटकात 9 बाद 149 धावा करता आल्या. त्यानंतर पंजाबने 18.5 षटकात 2 गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य सहजपणे गाठले. ख्रिस गेलने 29 चेंडूत 51 तर मनदीपने 56 चेंडूत नाबाद 66 धावांची आतषबाजी केली.
विजयासाठी 150 धावांचे आव्हान असताना पंजाबचा कर्णधार केएल राहुल 25 चेंडूत 28 धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल व युवा भारतीय फलंदाज मनदीप सिंग यांनी दुसऱया गडय़ासाठी शतकी भागीदारी साकारत विजयात सिंहाचा वाटा उचलला. विजयासाठी अवघ्या 3 धावांची गरज असताना ख्रिस गेल झेलबाद झाला. पण, तोवर पंजाबचा विजय सुनिश्चित झाला होता. निकोलस पूरनने पुढे एकेरी धाव घेत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
शमीचा तिखट मारा

तत्पूर्वी, मोहम्मद शमी (3-35), जॉर्डन (2-25) व रवी बिश्नोई (2-20) यांच्या भेदक माऱयासमोर नाईट रायडर्स संघाला निर्धारित 20 षटकात 9 बाद 149 धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीवीर शुभमन गिलचे (45 चेंडूत 57) दमदार अर्धशतक व इयॉन मॉर्गन (25 चेंडूत 40), लॉकी फर्ग्युसन (13 चेंडूत नाबाद 24) यांची फटकेबाजी, हे केकेआरच्या डावातील आकर्षण ठरले.
शुभमन गिलने पुन्हा एकदा बहरात येत पंजाबच्या गोलंदाजांचा उत्तम समाचार घेतला तर मॉर्गनने देखील धावगती उंचावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. अंतिम टप्प्यात फर्ग्युसनच्या फटकेबाजीमुळे केकेआरला दीडशे धावांच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचता आले.
किंग्स इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिंकल्यानंतर केकेआरला या लढतीत प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले होते. सलामीवीर नितीश राणा खातेही न उघडता पहिल्याच चेंडूवर बाद झाला, तो केकेआरसाठी पहिला धक्का ठरला.राणाने ऑफस्पिनर मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर शॉर्ट फाईन लेगवरील ख्रिस गेलकडे सोपा झेल दिला.
त्यानंतर राहुल त्रिपाठी व दिनेश कार्तिक देखील एकेरी धावसंख्येतच गारद झाले. या उभयतांनाही अनुभवी शमीने तंबूचा रस्ता दाखवला.
योगायोगाने दोघेही यष्टीरक्षक केएल राहुलकरवीच झेलबाद झाले. यापैकी दिनेश कार्तिकने मुख्य पंचांच्या निर्णयावर डीआरएस घेतला. चेंडू बॅटजवळून गेला, त्यावेळी बॅट पॅडवर आदळल्याचा त्याचा कयास होता. पण, स्निकोमध्ये चेंडूने बॅटची कड घेतल्याचे आणि यावेळी बॅटचा पॅडला स्पर्श झाला नसल्याचे स्पष्ट झाले आणि तिसऱया पंचांनी पूर्वीचा निर्णय कायम ठेवला होता.
तीन दिवसांपूर्वीच पितृशोक… अन् मनदीपची धीरोदात्त खेळी
मूळ जालंधर, पंजाबचा असलेल्या मनदीपच्या वडिलांचे तीन दिवसांपूर्वीच निधन झाले. पण, हे वैयक्तिक दुःख बाजूला सारत मैदानात उतरणाऱया मनदीप सिंगने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. धावा कितीही कर, पण, नाबाद रहा, असे आपले वडील आपल्याला नेहमी सांगायचे, असे सांगत असताना मनदीप बराच भावूक झाला होता. या लढतीत तो 66 धावांवर नाबाद राहिला.
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स : शुभमन गिल झे. पूरन, गो. शमी 57 (45 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार), नितीश राणा झे. गेल, गो. मॅक्सवेल 0 (1 चेंडू), राहुल त्रिपाठी झे. राहुल, गो. शमी 7 (4 चेंडूत 1 षटकार), दिनेश कार्तिक झे. राहुल, गो. शमी 0 (2 चेंडू), इयॉन मॉर्गन झे. अश्विन, गो. बिश्नोई 40 (25 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), सुनील नरेन त्रि. गो. जॉर्डन 6 (4 चेंडूत 1 चौकार), कमलेश नागरकोटी त्रि. गो. अश्विन 6 (13 चेंडू), पॅट कमिन्स पायचीत गो. बिश्नोई 1 (8 चेंडू), लॉकी फर्ग्युसन नाबाद 24 (13 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), चक्रवर्ती वरुण त्रि. गो. जॉर्डन 2 (4 चेंडू), एम. प्रसिद्ध कृष्णा नाबाद 0 (1 चेंडू). अवांतर 6. एकूण 20 षटकात 9 बाद 149.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-1 (राणा, 0.2), 2-10 (त्रिपाठी, 1.4), 3-10 (दिनेश कार्तिक, 1.6), 4-91 (मॉर्गन, 9.5), 5-101 (सुनील नरेन, 10.6), 6-113 (नागरकोटी, 14.2), 7-114 (कमिन्स, 15.4), 8-136 (शुभमन, 18.3), 9-149 (वरुण, 19.5).
गोलंदाजी : मॅक्सवेल 2-0-21-1, शमी 4-0-35-3, अर्शदीप सिंग 2-0-18-0, मुरुगन अश्विन 4-0-27-1, जॉर्डन 4-0-25-2, रवी बिश्नोई 4-1-20-2.
किंग्स इलेव्हन पंजाब : केएल राहुल पायचीत गो. वरुण 28 (25 चेंडूत 4 चौकारांसह 28), मनदीप सिंग नाबाद 66 (56 चेंडूत 8 चौकार, 2 षटकार), ख्रिस गेल झे. प्रसिद्ध कृष्णा, गो. फर्ग्युसन 51 (29 चेंडूत 2 चौकार, 5 षटकार), पूरन नाबाद 2 (3 चेंडू). अवांतर 3. एकूण 18.5 षटकात 2 बाद 150.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-47 (केएल राहुल, 7.6), 2-147 (ख्रिस गेल, 18.1)
गोलंदाजी : पॅट कमिन्स 4-0-31-0, एम. प्रसिद्ध कृष्णा 3-0-24-0, चक्रवर्ती वरुण 4-0-34-1, सुनील नरेन 4-0-27-0, लॉकी फर्ग्युसन 3.5-0-32-1.









