वर्चस्व गाजवूनही पंजाबच्या पदरी निराशा, केएल राहुल-मायंकची शतकी भागीदारी निष्फळ
वृत्तसंस्था/ अबु धाबी
शेवटच्या चेंडूत 7 धावांचे चमत्काराशिवाय कठीण असलेल्या आव्हानासमोर मॅक्सवेलने निराशा केल्यानंतर किंग्स इलेव्हन पंजाब संघाला केकेआरविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात 2 धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 164 धावा जमवल्यानंतर पंजाबतर्फे केएल राहुल (74), मायंक अगरवाल (39 चेंडूत 56) यांनी 115 धावांची दणकेबाज शतकी सलामी साकारली होती. पण, त्यानंतर त्यांचा डाव अचानक गडगडला आणि केकेआरने शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय प्राप्त केला. पंजाबला 20 षटकात 5 बाद 162 धावांपर्यंत मजल मारता आली.
निर्धारित 20 षटकात 165 धावांचे आव्हान असताना केएल राहुल व मायंक यांनी 14.2 षटकात 115 धावांची तडाखेबंद सलामी दिली. उर्वरित 5.4 षटकात 50 धावांचे आव्हान मात्र पंजाबसाठी भारी ठरले.
मायंक बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील निकोलस पूरन (16), प्रभसिमरन सिंग (4) स्वस्तात परतले आणि अचानक हा सामना पंजाबच्या हातातून सुटत गेला. केएल राहुल चौथ्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला, त्यावेळी पंजाबने 19 षटकात 4 बाद 151 धावा जमवल्या होत्या. मात्र, शेवटच्या षटकात 14 धावांची गरज असताना मॅक्सवेल अपेक्षापूर्ती करु शकला नाही आणि केकेआरने अंतिम क्षणी मुसंडी मारत दोन गुण वसूल केले.
शुभमनचे अर्धशतक
प्रारंभी, केकेआरने 20 षटकात 6 बाद 164 धावा जमवल्या, त्यात शुभमन गिलच्या 47 चेंडूतील 57 धावांचा मोलाचा वाटा राहिला. दिनेश कार्तिकने पाचव्या स्थानी फलंदाजीला उतरत 29 चेंडूत जलद 58 धावांची आतषबाजी केली. तोच सामनावीर पुरस्काराचा मानकरीही ठरला.
शेवटच्या षटकात काय घडले?

पूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवणाऱया पंजाबला येथे शेवटच्या षटकात 14 धावांची गरज होती. मात्र, फिरकीपटू सुनील नरेनच्या पहिल्या 4 चेंडूवर मॅक्सवेलला केवळ 7 धावा जमवता आल्या. त्यातही एका लेगबाय धावेचा समावेश होता. 2 चेंडूत 7 धावांची गरज असताना मनदीप सिंग पायचीत झाला. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 7 धावांचे आव्हान असताना मॅक्सवेलला केवळ चौकार फटकावता आला आणि या लढतीत केकेआरने अंतिम क्षणी मुसंडी मारली. मॅक्सवेलने नरेनचा हा चेंडू षटकारासाठीच फटकावला होता. पण, सीमारेषेपासून काही इंच आत चेंडू पडून पुढे गेला आणि मॅक्सवेलसह पंजाब संघाचीही निराशा झाली. मैदानी पंच गॅफनी यांनी तीक्ष्ण नजरेने ते टिपले होते. रिप्लेमध्येही त्यावरच शिक्कामोर्तब झाले.
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स : राहुल त्रिपाठी त्रि. गो. मोहम्मद शमी 4 (10 चेंडूत 1 चौकार), शुभमन गिल धावचीत (मनदीप सिंग-प्रभसिमरन सिंग) 57 (47 चेंडूत 5 चौकार), नितीश राणा धावचीत (मोहम्मद शमी-पूरन) 2 (4 चेंडू), इयॉन मॉर्गन झे. मॅक्सवेल, गो. रवी बिश्नोई 24 (23 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), दिनेश कार्तिक धावचीत (पूरन-प्रभसिमरन सिंग) 58 (29 चेंडूत 8 चौकार, 2 षटकार), आंद्रे रसेल झे. प्रभसिमरन सिंग, गो. अर्शदीप 5 (3 चेंडूत 1 चौकार), पॅट कमिन्स नाबाद 5 (4 चेंडू). अवांतर 9. एकूण 20 षटकात 6 बाद 164.
गडी बाद होण्याचा क्रम
1-12 (राहुल त्रिपाठी, 2.4), 2-14 (नितीश राणा, 3.3), 3-63 (मॉर्गन, 10.4), 4-145 (शुभमन, 17.5), 5-150 (रसेल, 18.2), 6-164 (दिनेश कार्तिक, 19.6).
गोलंदाजी
शमी 4-0-30-1, अर्शदीप सिंग 4-1-25-1, ख्रिस जॉर्डन 4-0-37-0, मुजीब रहमान 4-0-44-0, रवी बिश्नोई 4-0-25-1.
किंग्स इलेव्हन पंजाब : केएल राहुल त्रि. गो. प्रसिद्ध कृष्णा 74 (58 चेंडूत 6 चौकार), मायंक अगरवाल झे. शुभमन गिल, गो. प्रसिद्ध कृष्णा 56 (39 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), निकोलस पूरन त्रि. गो. नरेन 16 (10 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), प्रभसिमरन सिंग झे. राणा, गो. प्रसिद्ध कृष्णा 4 (7 चेंडू), मॅक्सवेल नाबाद 10 (5 चेंडूत 2 चौकार), मनदीप सिंग झे. बदली खेळाडू (ग्रीन), गो. नरेन 0 (1 चेंडू), जॉर्डन नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 2. एकूण 20 षटकात 5 बाद 162.
गडी बाद होण्याचा क्रम
1-115 (मायंक, 14.2), 2-144 (निकोलस, 17.2), 3-149 (प्रभसिमरन, 18.4), 4-151 (केएल राहुल, 18.6), 5-158 (मनदीप, 19.5).
गोलंदाजी
पॅट कमिन्स 4-0-29-0, एम. प्रसिद्ध कृष्णा 4-0-29-3, कमलेश नागरकोटी 3-0-40-0, चक्रवर्ती वरुण 4-0-27-0, सुनील नरेन 4-0-28-2, नितीश राणा 1-0-
7-0.









