घनदाट जंगलात बसमध्ये उपाशी पोटी रात्र काढली : अपुऱया माहितीमुळे विद्यार्थी वर्गाचा सरकारवर रोष
गिरीश मांद्रेकर/ म्हापसा
लॉकडाऊन शिथिल केल्याने ऑनलाईनद्वारे अर्ज केलेल्या बेंगलोर येथील 44 गोमंतकीय विद्यार्थ्यांना गोव्यात बस घेऊन आली असता मोले चेक नाक्यावर कोरोन्टाईनची तपासमी केल्यावर दोन बसेसमधील 44 विद्यार्थ्यांना रात्रभर नाहक अडवून ठेवण्याची घटना सोमवारी चेक नाक्यावर घडली. घनदाट जंगल, उपाशीपोटी, खायलाही काही नाही आणि विशेषतः म्हणजे शौचालयाचीही सोय नाही. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांनी रात्र कशीबशी काढली. विशेष म्हणजे यात मुलींचाही समावेश होता. आमच्या मुलांना रात्रभर नाहक अडवून ठेवणाऱया पोलिसावर कारवाई करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी या मुलांच्या पालकांनी दै. तरुण भारत ला बोलताना सांगितले. सरकारच्या या गैरकारभाराबद्दल युवा विद्यार्थी वर्गांनी तीव्र संताप व्यक्त करीत निषेध व्यक्त केला आहे.
राज्य सरकार कोविड विरुद्ध अथक प्रयत्न करीत असून गोमंतकीय नागरिकांना मात्र अशी सेवा दिली जाते. सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान दोन बसेस या विद्यार्थ्यांना उत्तर व दक्षिण गोव्यात घेऊन आले होते मात्र उत्तरेतील बस दक्षिणेत व दक्षिणेतील बस उत्तरेत कोरोन्टाईनसाठी पाठविण्यात आल्याने बसचालकांनाही काय करावे हा यक्ष प्रश्न पडला. अखेर मोलेहून आलेली बस तब्बल 9 तासांनी म्हापसा आझिलो इस्पितळात कोरोन्टाईन करण्यासाठी सायं. 4 वाजण्याच्या दरम्यान आणण्यात आली व नंतर त्यांना कळंगूट रेझीडन्सीमध्ये 14 दिवसांच्या होमकोरोन्टाईनसाठी पाठवून देण्यात आले.

पहाटेपर्यंत तपासणी
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार उत्तर गोवा न्यायदंडाधिकारीच्या आदेशानुसार संतोष नाईक व तुकाराम भोसले या चालकांना खासगी बस क्र. जीए-03-एन-4788 यांना कालाकुराची तामिळनाडू ते गोवा मोलेचे चेकपोस्ट दरम्यान गोव्यात वाहतूक करण्यासाठी खास परमीट देण्यात आले त्यानुसार दोन बसेस बेंगलोर येथे जाऊन तेथे अडकलेल्या 44 गोव्यातील विद्यार्थ्यांना घेऊन गोव्यात आले. एका बसमध्ये 24 व दुसऱया बसमध्ये 20 असे 44 जणांना बेंगलोरहून दोन बसेस रविवारी रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान मोले चेकपोस्टवर पेहोचल्या. बसची तपासणी केली व या विद्यार्थ्यांना कोरोन्टाईन तपासणीच्या नावाखाली तपासणी करण्यात आली असता पहाटे 3.30 वाजेपर्यंत ही तपासणी सुरूच राहिली. घनदाट जंगलात खाण्यासाठी काही नाही त्यात गर्मी व तपासणी यामुळे विद्यार्थी वर्ग हैराण झाले.
कैद्याप्रमाणे आम्हाला घनदाट जंगलात ठेवनले– केदर धारगळकर
बोंगलोर येथे आयटी क्षेत्रात काम करणारे धारगळ येथील सुपुत्र केदार धारगळकर यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आमच्या बसमध्ये एकूण 20 जणांना सोशल डिन्टन्सी ठेवून आणण्यात आले आहे. 9 मे रोजी बेंगलोरहून 2 बसेस गोमंतकीय नागरिकांना भरून गोव्याकडे निघाल्या. 10 मे रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आम्ही मोले चेकपोस्टवर पोहोचलो. त्यानंतर दोन तास आम्हा सर्वांचे रजिस्ट्रेशन करून आमची तपासणी करण्यात आली व नंतर पहाटे 2.30 ते सकाळी 9 वाजेपर्यंत डय़ुटीवरील पोलिसांनी आम्ही कैदी असल्याप्रमाणे घटदाट जंगलात बसमध्येच बसून ठेवले. बाहेर जाण्यासही दिले नसल्याचा आरोप धारगळकर यांनी केला. आम्ही मुख्यमंत्री आदी आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र आम्हाला संपर्क होऊ शकला नाही. तोपर्यंत पहाट झाली मात्र पोलीस सोडण्यास तयार नाही. कसेबसे कुणीतरी नंतर आपल्या ओळखीने पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांना संपर्क केला व घटनेची माहिती दिली. तोपर्यंत सकाळ झाली होती. नंतर आमदार खंवटे यांनी जिल्हाधिकाऱयांशी संपर्क केला व तेथून आमची सुटका झाली. आम्हाला मोलेहून होमकोरोन्टाईनसाठी म्हापशाला आणायला पाहिजे होते. मात्र कारण नसताना आम्हाला मडगावला नेण्यात आले. रात्रभर एकतर पाणी नाही त्यात उपाशी पोट आणि आम्ही सर्वजण ओरडल्यानंतर तेथे आम्हाला नास्ता दिला त्यानंतर मडगावला नेल्यावर तेथील पोलिसांनी तुम्हाला उत्तर गोव्यात न्यायला पाहिजे आहे असे सांगून म्हापशात पाठवून देण्यात आल्याचे ते म्हणाले. आता 4.30 वाजले म्हापसा आझिलोत तपासणी करून आता होमकोरोन्टाईनसाठी कळंगूट रेझीडन्सीमध्ये आम्हाला ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
असे संकट अन्य कुणावर नको
बॉर्डरवरून सरकारने सर्व परवाने व योग्य माहिती देऊन इतरांना त्वरित त्यांच्या घरी पाठवावे असे केदार धारगळकर म्हणाले. आमच्यावर जी संकटे आली ती अन्य कुणावरही न येवो असे त्यांनी सांगितले. गोवा ऑनलाईनवर आम्ही घरी येण्यासाठी अर्ज केला असता त्या आधारे आम्ही गोव्यात दाखल झालो असे ते म्हणाले.
कदंबच्या नावाखाली सेमी लक्झरी बस
आम्हाला कदंब वॉल्वो बस देणार असे सांगितले होते मात्र येथे सेमी लक्झरी बस देण्यात आल्याने गर्मीच्या दिवसात आम्हाला बराच त्रास झाला. बसमध्ये एसी नाही व बसमध्ये ये-जा करण्यास ती तशी सूट नाही. बॉर्डरवरून आणताना योग्यरीत्या व्यवस्थापन न झाल्याने आम्ही सुमारे 9 तास अडकून पडलो असल्याचे केदार धारगळकर यांनी स्पष्ट केले.
टॉवेल साबण दिला मात्र पाणी नाही

हणजूण येथील नागरिक तथा अलिकडेच डिसेंबर 2019 मध्ये बेंगलोर येथे नव्याने कामाला रुजू झालेली विद्यार्थिनी म्हणाली, गेली 32 तास आम्ही वॉशरूम योग्यरीत्या वापरलेला नाही ही सरकारसाठी निंदनीय गोष्ट आहे. आम्हाला मडगाव हॉस्पिसियो हॉस्पिटलनजिक एका हॉटेलात नेण्यात आले. तेथे टॉवेल, साबण देण्यात आला मात्र पाणी नाही मग आम्ही वॉशरूमचा कसा वापर करणार. तेथे पोलीस विचारतात उत्तर गोव्याची गाडी दक्षिणेत कशी आणली त्यानंतर आम्ही सर्वांनी आवाज केल्याने आम्हाला म्हापशात पाठविण्यात आले मात्र पर्वरी पोलीस स्थानकावर नेऊन कळंगूटला होमकोरोन्टाईन निवाऱयात नेण्याचे ठरले मात्र आम्ही आवाज केल्याने अर्ध्या वाटेवरून पुन्हा आम्हाला जिल्हा आझिलोत तपासणीसाठी आणून सोडले आहे. आता येथे किती वेळ जाईल हे सांगता येत नाही.
आमच्या मुलांना नाहक अडवून ठेवणाऱया पोलिसावर कारवाई करा
दरम्यान बेंगलोरहून गोव्यात परतलेल्या विद्यीर्थी वर्गाच्या पालकांनी म्हापसा जिल्हा आझिलोजवळ येऊन आपापल्या मुलाची पाहणी केली व सुटकेचा श्वास सोडला. काही पालकांनी आपल्या मुलांसाठी पाणी, खाण्यासाठी जेवण आणलेले होते ते त्यांना सुपूर्द केले. यावेळी बोलताना पालक वर्गांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत रात्री घडलेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. रात्रभर आमच्या मुलांना घनदाट जंगलात तिष्ठत ठेवणाऱया पोलिसांवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी पालकवर्गांनी स्थानिक पत्रकारांशी बोलताना केली. असा प्रकार पुन्हा अन्य गोमंतकीयांवर होऊ नये असे ते म्हणाले. दरम्यान यासर्वांना म्हापसा जिल्हा आझिलोमध्ये तपासणी करून कळंगूट रेझीडन्सीमध्ये कोरोन्टाईनसाठी पाठविण्यात आले.









