सर्बिया, बोस्निया हर्जेगोविना, क्रोएशिया हे देश आले एकत्र
जगात सुरू असलेल्या कोरोना महामारीदरम्यान एक चांगले वृत्त समोर आले आहे. कित्येक वर्षे जुने शत्रुत्व विसरून परस्परांचे कट्टर विरोधक असलेल्या देशांची मने पुन्हा जुळताना दिसून येत आहेत. सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये स्थानिक लोकांनी अन्य देशांप्रमाणेच खिडकी आणि बाल्कनीमधून परिचारिका, डॉक्टर्स आणि पोलीस अधिकाऱयांचे स्वागत केले आहे. 22 मार्च रोजी सर्बियाच्या लोकांनी क्रोएशियाचे समर्थन केले होते.
क्रोएशिया या देशाने सर्बियाच्या विरोधात 30 वर्षांपूर्वी युद्ध केले होते. युद्धाच्या दिवशीच क्रोएशियाची राजधानी जगरेब येथे 140 वर्षाच्या इतिहासातील सर्वात मोठा भूकंप झाला होता. या भूकंपानंतर बोस्निया हर्जेगोविनाचे नागरिक क्रोएशियाच्या समर्थनार्थ उतरले होते. या कृतीमुळे क्रोएशिया आणि परिसरातील अन्य भागांमध्ये चांगला संदेश गेला होता.
सुमारे 30 वर्षांच्या इतिहासात सर्बियाने पहिल्यांदाच क्रोएशियाचे उघडपणे समर्थन केले आहे. भूकंपानंतर क्रोएशियाने एका व्यंगचित्राच्या मदतीने ढिगारा हटविण्यासाठी मदतीचे आवाहन केले होते.
क्रोएशियाच्या मदतीसाठी बोस्निया हर्जेगोविनाच्या सराजेवा शहरातील हॉलमध्ये रंगबिरंगी रोषणाई करण्यात आली आहे. या कृतीचा दोन्ही देशांमध्ये चांगला प्रभाव पडला आहे. “कोरोना विषाणूला बोस्निया हर्जेगोविनामध्ये कुठलाच वाव नाही, कारण येथे येऊन तो विभागला जाईल आणि कमकुवत पडेल’’ अशाप्रकारचा विनोद बाल्कन क्षेत्रात केला जातो.
कोरोना संकट आता बोस्निया हर्जेगोविना, सर्बिया आणि क्रोएशिया या देशांना एकत्र आणत आहे. कोरोनाशी चाललेल्या युद्धाकरता या देशांमधील विविध समुहांची रुग्णालये देखील एकत्र येऊ लागली आहेत. या देशांमध्ये वांशिक आणि धार्मिक वाद बाजूला सारून लोक परस्परांची मदत करू लागले आहेत. रुग्णालयात दाखल लोकांना अन्न पुरविले जात आहे. या भागातील यशस्वी क्रीडापटू देणगी देऊन आरोग्य यंत्रणा सुधारू पाहत आहेत. 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच सर्बियाने क्रोएशियाचे उघडपणे समर्थन केले आहे.









