बरे होण्याचे प्रमाण 97.01 टक्के : मडगावच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ
प्रतिनिधी /पणजी
कोरोनामुळे बुधवारी तिघांचे बळी गेले असून ते सर्व गोमेकॉत उपचार घेत होते. त्याशिवाय गत 24 तासात 192 बाधित सापडले आहेत तर 196 जण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 97.01 टक्क्यांवर पोहोचले आहे. सक्रिय रुग्णसंख्या 1950 एवढी झाली आहे.
बुधवारी 5022 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 192 बाधित सापडले. त्यापैकी 22 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 170 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले. 20 जणांना गोमेकॉतून घरी पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत वर्षभरातील एकूण बाधितसंख्या 168015 वर पोहोचली आाहे तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 162983 वर पोहोचली आहे. एकूण मृतसंख्या 3082 एवढी झाली आहे. मंगळवारी मृत्यू झालेले तिन्ही पुरुष रुग्ण गोमेकॉत उपचार घेत होते. ते सर्वजण 64 ते 74 वर्षे वयोगटातील आहेत.
मडगावच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ
मडगाव केंद्रातील रुग्णसंख्या बुधवारी पुन्हा तीन अंकी बनली आहे. मंगळवारी तेथे 95 रुग्ण होते. बुधवारी त्यात 11 रुग्णांची भर पडत 106 वर पोहोचली. त्याशिवाय कुठ्ठाळी आणि फोंडा या केंद्रातही तीन अंकी संख्येने रुग्ण आहेत. सध्या सर्वाधिक 123 रुग्ण कुठ्ठाळीत तर सर्वात कमी 12 रुग्ण कासारवर्णे केंद्रात आहेत.









