32 देशांच्या 239 वैज्ञानिकांचा दावा : जगभरात आतापर्यंत 1 कोटी 15 लाख 85 हजार 101 कोरोनाबाधित
कोरोना विषाणू हवेतूनही फैलावू शकतो असा दावा 32 देशांच्या 239 वैज्ञानिकांनी केल्याचे द न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनला (सीडीसी) पत्र लिहून या दाव्याची पडताळणी करण्याची आणि दिशानिर्देशांमध्ये बदल करण्याची विनंती या वैज्ञानिकांनी केली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतून फैलावत नाही, हा केवळ थुंकीच्या थेंबाद्वारेच फैलावतो, हे थेंब कफ, शिंक आणि बोलतेवेळी शरीरातून बाहेर पडतात. हे थेंब हलके नसल्याने हवेसोबत दूरपर्यंत वाहून जाऊ शकत नाही, ते अत्यंत वेगाने जमिनीवर कोसळतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वी म्हटले होते.
घरातही एन-95 आवश्यक
वैज्ञानिकांनी यासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेला खुले पत्र लिहिले आहे. शिंकताना, खोकताना किंवा जोरजोरात बोलतेवेळी बाधिताच्या तोंडावरून बाहेर पडलेले थेंब हवेत तरंगून दुसऱया व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतात. यातून इतरांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. अशा स्थितीत घरात असताना देखील एन-95 मास्क परिधान करण्याची गरज असल्याचे वैज्ञानिकांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
डब्ल्यूएचओ भूमिकेवर ठाम

हवेतून कोरोना संसर्ग फैलावणे शक्य आहे, परंतु याचे ठोस पुरावे आतापर्यंत मिळाले नसल्याचे मागील काही महिन्यांमध्ये अनेकदा स्पष्ट केल्याचे डब्ल्यूएचओच्या तांत्रिक पथकाचे प्रमुख डॉ. बेनेडेटा अलेग्रांजी यांनी म्हटले आहे. 29 जून रोजी जागतिक आरोग्य संघटनेने स्वतःच्या दिशानिर्देशांमध्ये सुधारणा केली होती. हवेतून कोरोना संसर्ग वैद्यकीय प्रक्रियेतूनच शक्य असून एअरोसॉल किंवा 5 मायक्रॉनपेक्षा लहान ड्रॉपलेट्स तयार होत असल्यास असे घडू शकते. एक मायक्रॉन एका सेंटीमीटरचा 10 हजारावा भाग असतो.
युद्धपातळीवर संशोधन
कोरोना संसर्गासंबंधी विविध देशांमध्ये संशोधन सुरू असून यातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोना संसर्गाचे स्वरुप, विषाणूत होत असलेले बदल, उपचारपद्धतीबद्दल दिवसेंदिवस माहितीत भर पडत आहे.
एअरोसॉलमध्ये कोरोना नाही
प्रयोगशाळेत एअरोसॉलमधून कोरोना विषाणू निर्माण करता आलेला नाही, परंतु याचा अर्थ यातून संसर्ग फैलावत नाही असा होत नाही. यावर करण्यात आलेल्या प्रयोगांमध्ये बहुतांश नमुने रुग्णालयाच्या उत्तम वातावरणातून प्राप्त करण्यात आले होते, तेथे संसर्गाची पातळी कमी असते असे संशोधनात सामील डॉ. मॅर यांनी म्हटले आहे.
मिसिसिपीच्या सभापतींना बाधा

मिसिसिपीचे हाउस स्पीकर फिलिप गन्न यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सभागृहाच्या सदस्याच्या ते संपर्कात आले होते. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत असल्याने मी सुदैवी आहे. परंतु मी विलगीकरणात राहणार आहे. बाधिताच्या संपर्कात आल्यास चाचणी करा आणि आयसोलेशनमध्ये जा असे गन्न यांनी म्हटले आहे.
9/11 तून वाचला पण..

वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यावेळी पळून जीव वाचविणाऱया व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. 78 वर्षीय इलेक्ट्रिक इंजिनियर स्टीफन कूपर न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास होते. 9/11 हल्ल्यादरम्यान पळतानाचे त्यांचे छायाचित्र जगभरातील प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले होते.
पाकचा सल्लागार बाधित

पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी यांच्यानंतर आता इम्रान खान यांचे विशेष सल्लागार जफर मिर्झा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जफर मिर्झा यांनी ट्विटरवर याची माहिती दिली आहे. यापूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी आणि युसूफ रझा गिलानी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
चीन : प्राध्यापक अटकेत

चीनमध्ये सोमवारी कायद्याच्या प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. प्राध्यापकाने कोरोना महामारीसंबधी अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यावर टीका केली होती. बीजिंगमध्ये प्राध्यापक जू झंगरुन यांना 20 पेक्षा अधिक जणांनी घरातून उचलून नेले आहे. जू यांनी फेब्रुवारी महिन्यात जिनपिंग यांच्यावर टीका करणारा लेख प्रसारित केला होता.
हजदरम्यान बैठकांवर बंदी

सौदी अरेबियाच्या सरकारने हज यात्रेसंबंधी दिशानिर्देश प्रसिद्ध केले आहेत. यात्रेकरूंना मास्क परिधान करणे अनिवार्य असेल. तसेच एका ठिकाणी जमा होणे किंवा बैठका घेण्यावर बंदी असणार आहे. यंदाच्या यात्रेत पवित्र काबाला स्पर्श करण्यास मनाई आहे. तर यंदाच्या यात्रेत विदेशी यात्रेकरूंना सहभागी होता येणार नाही.









