निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांची माहिती
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून ही बाब सोलापूरकरांसाठी चिंताजनक बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या सोमवारी केंद्रीय पथक पाहणीसाठी सोलापुरात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी रविवारी दिली.
रुग्ण आढळून आलेल्या या भागातील प्रतिबंधित क्षेत्रांची, कोविड केअर सेंटरची पाहणी करून प्रशासनाने नेमक्या काय उपाययोजना केल्या, क्वांरटाईन कसे केले आहे, याची माहिती केंद्रीय पथक घेणार आहे.
लॉकडाउनच्या सुरुवातीच्या 26 दिवसात सोलापुरात एकही रुग्ण नव्हता. त्यामुळे सोलापूर जिल्हा ग्रीन झोन मध्ये गेला होता. दरम्यान 12 एप्रिल रोजी एक रुग्ण आढळून आला. तो मृत्यू पावला. त्यानंतरच्या चौदा दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल 50 वर गेली. आतापर्यंत एकूण चौघांचा मृत्यू झाला. मुंबई, पुण्यानंतर सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने प्रशासनाच्याही चिंतेत भर पडली आहे. यावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
दरम्यान माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोलापुरात केंद्रीय पथक पाठविण्याची मागणी केली होती. ठाकरे यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही डोंगरे यांनी पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार उद्या (सोमवारी) केंद्रीय पथक सोलापुरात येत असून या पथकातील सदस्यांकडून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्थापन करण्यात आलेल्या आयसोलेशन कक्षाबरोबरच अन्य सोयीसुविधांची पाहणी केली जाणार आहे.
Previous Articleराज्यात शंभर पोलिसांना कोरोना,दोघांचा मृत्यू तरीही १२ तास ड्यूटी
Next Article तेल गेले….. तूपही गेले









