वार्ताहर / शाहूपुरी :
दिवाळीसाठी ग्राहकांना सुरक्षित वातावरणात खरेदी करता यावी, याची काळजी शहरातील बहुतांश व्यावसायिकांनी घेतली आहे. ग्राहकांना आश्वस्त करण्यासाठी दुकानाच्या दर्शनी भागावर सुरक्षित खरेदीच्या माहितीसह घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती व्यापाऱ्यांनी प्रदर्शित केल्याने ग्राहकही सुखावला आहे.
मार्च महिन्यापासून बंद असलेली बाजारपेठ जूनमध्ये खुली झाली. पणग्राहकांचा अपेक्षित ओघ दुकानांपर्यंत पोहोचलाच नाही. त्यातच कोरोनारुग्णांची संख्या वाढत गेली आणि सर्वकाही खुलं असूनही ग्राहक दुकानांकडे फिरकलेच नाहीत. ऑक्टोबर महिन्यात कोविड रुग्णांची संख्या खालावत गेल्याने नागरिकांनी सर्व व्यवहार पूर्ववत सुरू करण्याचे ठरविले. परिणामी सहा महिन्यांपासून शांत असलेली बाजारपेठ पुन्हा एकदा दिवाळीच्या तयारीने सजू लागली आहे.
वर्षाचा सर्वात मोठा सण असणारीदिवाळी सुरक्षितपणे साजरी करतायावी आणि दुकानांमध्ये खरेदीच्या निमित्ताने कुठंही गर्दी होऊन कोविडचा प्रसार होऊ न देण्याची खबरदारी व्यावसायिक घेऊ लागले आहेत.









