नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन -सण-समारंभ साधेपणाने साजरे होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना संकटाची तीव्रता वाढत असल्यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱया सभा, संमेलन, चर्चासत्र, शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, मोर्चा, मेळावा, आंदोलन यांचे आयोजन थांबवण्यात आले आहे. लोकांना सण, समारंभ घरातच साधेपणाने साजरे करण्याचे तसेच कोविड नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच केंद्र सरकारने नवी ‘पंचसूत्री’ जारी केली असून सदर नियमांचे पालन करण्याची सूचना केली आहे.
देशातील ज्या जिह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे त्या जिह्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवणे. जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचणे. तसेच देशाच्या कानाकोपऱयात आवश्यकतेप्रमाणे पुरेसा लसच्या डोसचा पुरवठा करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत.
कोरोना चाचण्यांची संख्या वाढवणे. जास्तीत जास्त आरटी-पीसीआर चाचण्या करणे आणि कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्यांची आवश्यकतेनुसार कोरोना चाचणी करणे. विलगीकरण अर्थात आयसोलेशन आणि कॉन्टॅक्ट टेसिंगवर भर देणे. जास्तीत जास्त 72 तासांत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासह बजावले आहे.
देशात दररोज ज्या संख्येने कोरोना चाचण्या होतात, त्याच्या किमान 70 टक्के आरटी-पीसीआर चाचण्या करण्यावर भर देणे. कोरोनाशी लढण्यासाठी प्रयोगशाळा, हॉस्पिटल, वैद्यकीय सोयी-सुविधा, ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर, पीपीई किट, फेस कव्हर, ग्लोव्हज, मास्क अशा पायाभूत सुविधांची निर्मिती आणि पुरवठा मोठय़ा प्रमाणात सुरू राहील याची खबरदारी घेण्याची सूचनाही केंद्र सरकारने केली आहे. तसेच गर्दी टाळणे, सार्वजनिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन टाळणे, नागरिकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी सातत्याने जनजागृती करत राहण्यासही सांगितले आहे.
बारा राज्यांना अतिदक्षतेचे निर्देश
केंद्र सरकारने 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्याअंतर्गत या राज्यांमधील कोरोना तपासणीची संख्या वेगाने वाढविण्यासाठी आणि कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगण्यात आले. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. ज्या राज्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले आहे अशा राज्यांसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली 12 राज्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य व कुटुंब कल्याण सचिव यांची उच्चस्तरीय बैठक झाली. यामध्ये कोरोना प्रभावित 46 जिह्यांतील महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारीही उपस्थित होते. बारा राज्ये-केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, तामिळनाडू, छत्तीसगड, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, पंजाब आणि बिहार यांचा समावेश आहे.









