मुकेश अंबानी कुटुंबाचा सहावा क्रमांक
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
गेले जवळपास दीड वर्ष जगाची अर्थव्यवस्था कोरोनाच्या सावटाखाली असून जगभरात आर्थिक मंदीचे संकट ओढवले आहे असे असूनही जगातील सर्वात श्रीमंत अशा पहिल्या 25 कुटुंबांच्या संपत्तीमध्ये 1.60 लाख कोटी डॉलर्सची भर पडली आहे. या क्रमावारीत वॉलमार्ट कंपनीचे वॉर्टन कुटुंब प्रथम क्रमांकावर असून मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाचा सहावा क्रमांक लागला आहे.
कोरोनाकाळात अर्थव्यवस्था मंदावली असली तरी अनेक शेअर बाजारांमध्ये मात्र मोठय़ा प्रमाणात तेजी दिसून आली. लोकांनी अन्यत्र पैसे गुंतवण्यापेक्षा शेअर बाजारावरच कोरोना काळात अधिक भिस्त ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक शेअर बाजार समाधानकारकरित्या वधारल्याने धनाढय़ांच्या संपत्तीत आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या बारा महिन्यांत जगातील पहिल्या सर्वात श्रीमंत अशा 25 कुटुंबांची संपत्ती 22 टक्क्यांनी वाढून 1 लाख 70 हजार कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. वॉलमार्टचा वॉर्टन परिवार श्रीमंतांच्या सूचित सलग चौथ्यांदा सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत. वॉलमार्टमध्ये या परिवाराची जवळपास 50 टक्के मालकी आहे. कॉस्मॅटिक ब्रँडचा लॉर्डस् परिवार तिसऱया क्रमांकावर आहे. तर जगप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगचा ली परिवार मात्र पहिल्या पंचवीसातही स्थान मिळवू शकलेला नाही, असे दिसून येते.
महागडय़ा वस्तूंची निर्मिती करणाऱया औद्योगिक परिवारांची संपत्ती कोरोना काळात सर्वाधिक वाढल्याचे दिसून येते. या यादीत मुकेश अंबानी परिवाराचा सहावा क्रमांक लागला असून या परिवाराची संपत्ती 9300.7 कोटी डॉलर्स इतकी असल्याचे एका अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.









