कोरोनामुळे वर्षभरात झालेल्या 20 मृत्यूंची आता नोंद
प्रतिनिधी /पणजी
ऑगस्ट 2020 ते जून 2021 या कालावधीत कोरोनामुळे झालेल्या 20 मृत्यूंची नोंद आता उशिरा करण्यात आल्याने एकूण मृतांचा आकडा वाढून 3821 झाला आहे. दरम्यान गेल्या 24 तासात म्हणजे सोमवारी 18 नवे बाधित सापडले असून 48 जण बरे झाले आहेत. सर्व 18 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले असून हॉस्पिटलमध्ये कोणालाही भरती करण्यात आले नाही. दिवसभरात एकाही मृत्यूंची नोंद झालेली नाही. सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 271 पर्यंत खाली आली असून त्याचा संसर्ग आता संपण्याच्या मार्गावर आहे.
आतापर्यंत मिळून एकूण 245019 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 240927 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे. मागील रविवारी एकूण मृतांची संख्या 3801 होती, परंतु 20 बळींची नोंद आता केल्यामुळे मृतांचा आकडा वाढून 3821 झाला असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
यापूर्वी अनेक वेळा अशा प्रकारे कोरोना बळींची संख्या उशिराने मृत्यूची नोंद करून वाढवण्यात आले असून या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
आस्थापने 100 टक्के क्षमतेने सुरु होणार
कॅसिनो, थिएटर, जीम इत्यादी व्यावसायिक आस्थापने पूर्ण 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यासाठी कोरोनाच्या तज्ञ समितीने हिरवा कंदील दाखवला असून सदर शिफारस लवकरच सरकारला पाठवण्यात येणार आहे. आता सरकारने त्यावर अंतिम निर्णय घ्यावा, असे समितीने सूचवले आहे. शाळादेखील पूर्ण क्षमतेने 100 टक्के सुरू करण्यास कोणतीच हरकत नसल्याची माहिती तज्ञ समितीचे प्रमुख सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी दिली आहे. मास्क, सॅनिटायझर याचे पालन आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









