हाँगकाँगमध्ये कठोर प्रवास निर्बंध लागू : आठवडाभरात 236 नवे रुग्ण : जगभरात 1,32,65,294 बाधित
जगभरात कोरोना विषाणूची आतापर्यंत 1 कोटी 32 लाख 65 हजार 294 जणांना लागण झाली आहे. यातील 77 लाख 31 हजार 164 बाधितांना संसर्गापासून मुक्ती मिळाली आहे. याचदरम्यान हाँगकाँगने प्रवास निर्बंध आणि शरीर अंतराचे नियम कठोर केले आहेत. हाँगकाँगमध्ये कोरोना संसर्गाची तिसरी लाट उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे. तेथे आठवडाभरात 236 नवे बाधित सापडले आहेत. सोमवारी केवळ 52 नवे रुग्ण सापडले असून यातील 41 स्थानिक तर उर्वरित 11 जण बाहेरून आलेले लोक आहेत. शहरात आता विशेष खबरदारी घेतली जात आहे.
बळींचे सत्र थांबले

कोरोना महामारीमुळे अनेक देश त्रस्त असताना बेल्जियमचे जनजीवन पूर्वपदावर परतू लागले आहे. कोविड-19 ने सर्वाधिक ग्रस्त राहिलेल्या बेल्जियममध्ये पहिल्यांदाच दिवसभरात एकाचाही बळी गेलेला नाही. 10 मार्चनंतर पहिल्यांदाच असे घडले आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये म्अनेक युरोपीय देशांप्रमाणेच बेल्जियममध्येही टाळेबंदी लागू करण्यात आली होती. संसर्ग घटू लागल्याने तेथील निर्बंध हळूहळू शिथिल केले जात आहेत.
चिली : 3.17 लाख रुग्ण

चिलीमध्ये मागील 24 तासांमध्ये 2,616 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील रुग्णांची संख्या आता वाढून 3,17,657 झाली आहे. तर बळींचा आकडा 7,024 वर पोहोचला आहे. मागील 24 तासांमध्ये देशात 17,467 चाचण्या झाल्या आहेत. चिलीमध्ये आतापर्यंत 13 लाख 10 हजार 265 जणांची चाचणी करण्यात आली आहे. चिलीमध्ये चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण सापडण्याचे प्रमाण खूपच अधिक आहे.
मलेशिया-सिंगापूर मार्ग सुरू होणार

मलेशिया आणि सिंगापूर यांच्यात प्रवास निर्बंधांमध्ये सूट देण्यासंबंधी सहमती झाली आहे. कोविड-19 महामारीमुळे दोन्ही देशांमधील मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. परंतु आता दोन्ही देशांदरम्यान आवश्यक प्रवास पुन्हा सुरू करण्यासंबंधी सहमती झाली आहे. रेसिप्रोकल ग्रीन लेन (आरजीएल) आणि पिरियोडिक कम्युटिंग अरेंजमेंट अंतर्गत दोन्ही देशांमधील पर्यटकांच्या सुविधा हाताळल्या जातात. आरजीएलच्या मदतीने आवश्यक व्यापार आणि अधिकृत कारणांसाठी प्रवास करता येणार आहे. तर इमिग्रेशन पास असलेल्या दोन्ही देशांच्या नागरिकांना पीसीए प्रवासाची अनुमती देणार आहे.
मास्कची सक्ती

ब्रिटनमध्ये 24 जुलैपासून दुकानांमध्ये जाण्यापूर्वी चेहरा झाकणे अनिवार्य करण्यात आले आहे. एका बंदिस्त ठिकाणी मास्क परिधान केल्याने लोकांमध्ये कोरोना संसर्ग फैलावण्यापासून रोखता येत असल्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत. याच कारणामुळे दुकानांमध्ये मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आल्याची माहिती डाउनिंग स्ट्रीट (पंतप्रधान कार्यालय)च्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
जलतरण तलावांवरील बंदीवरून गोंधळ

इस्रायलच्या विशेष संसदीय समितीने जलतरण तलाव तसेच व्यायामशाळा बंद करण्याचा मागे घेतला आहे. 6 जुलै रोजी सरकारने व्यायामशाळा आणि जलतरण तलावासह बार, नाइटक्लब आणि सार्वजनिक सभागृहांवर बंदी लादली होती. परंतु जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला होता. हॉटेल्समधील जलतरण तलाव बंद करण्याचा आदेश देण्यात आला नव्हता.
अमेरिकेत सर्वाधिक चाचण्या : ट्रम्प यांचा दावा

अमेरिकेत जगातील सर्वात मोठा टेस्टिंग प्रोग्राम आहे. भारत, रशिया आणि ब्राझील यासारख्या देशांपेक्षा तो अधिक कार्यक्षम आहे. अमेरिकेतील मृत्यूदर अन्य देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. 33 कोटी लोकसंख्या असलेल्या अमेरिकेत 4 कोटी 32 लाख 52 हजार 833 जणांची चाचणी झाली आहे. तर 21 कोटी लोकसंख्या असलेल्या ब्राझीलमध्ये 45 लाख आणि 138 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात 1 कोटी 20 लाखांहून अधिक चाचण्या झाल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तर पूर्ण देशात टाळेबंदी लागू न केल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचा दावा जागतिक साथरोगतज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी केला आहे.
दिवसभरात 65 हजार नवे रुग्ण
अमेरिकेत मागील 24 तासांमध्ये 65 हजार नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. देशातील रुग्णांचा एकूण आकडा आता 34,79,650 रुग्ण सापडले आहेत. तसेच कोरोनाबळींचे प्रमाण 1,38,247 वर पोहोचले आहे.
ऑगस्टमध्ये लसीच्या उत्पादनास प्रारंभ
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून अमेरिकेत लसीच्या उत्पादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रशासनाने मे महिन्यात आरोग्य आणि संरक्षण विभागासोबत मिळून लस विकसित करण्याचे कार्य हाती घेतले होते. जानेवारी 2021 पर्यंत कोरोना लसीचे 30 कोटी डोस तयार करण्याचे लक्ष्य अमेरिकेने बाळगले आहे.
अमेरिकेच्या प्रांतांची स्थिती
टेक्सास : गव्हर्नर ग्रेट अबॉट यांनी कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रांतामधील निर्बंध आणखीन कठोर केले आहेत. तर ह्युस्टनच्या महापौरांनी शहरात दोन आठवडय़ांचे शटडाउन लागू केले आहे.
कॅलिफोर्निया : गव्हर्नर गेविन न्यूसॉम यांनी प्रांतातील रेस्टॉरंट, बार, संग्रहालये आणि चित्रपटगृहे बंद केली आहेत.
ओरेगॉन : प्रांतातील वाढती रुग्णसंख्या पाहता कुठल्याही समारंभात 10 पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.









