अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत. सद्यकाळात ट्रम्प हे कोरोनाबाधित असल्याने व्हाइट हाउसमध्ये विलगीकृत आहेत. तर अमेरिकेत कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गावरून प्रसिद्ध द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनने स्वतःच्या 208 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच राजकीय संपादकीय लिहिले आहे. या लेखाद्वारे नियतकालिकाने ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
संकटाचे शोकांतिकेत रुपांतर
34 संपादकांच्या हस्ताक्षरित या संपादकीयाला बुधवारी प्रकाशित करण्यात आले होते. ट्रम्प यांनी कोरोना महामारीसाठी अत्यंत खराब प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक संकट घेतले आणि ते शोकांतिकेत बदलले असल्याचे लेखात म्हटले गेले आहे. परंतु या लेखात कुठल्याही प्रकारे डेमोक्रेट उमेदवार ज्यो बिडेन यांचे समर्थन करण्यात आलेले नाही. तरीही नियतकालिकाने अप्रत्यक्षपणे बिडेन यांचे समर्थन केल्याचे मानले जाते.
संपादकांकडून समर्थन
कुठल्याही लेखाला सर्व संपादकांनी हस्ताक्षरित करण्याची ही नियतकालिकाच्या इतिहासातील चौथी घटना असल्याचे उद्गार न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनचे मुख्य संपादक डॉ. एरिक रुबिन यांनी काढले आहेत. ज्यो बिडेन यांना पाठिंबा दर्शविणाऱया वैज्ञानिकांमध्ये या संपादकांचा समावेश आहे.
ट्रम्प प्रशासनावर निशाणा
अमेरिकेत प्रारंभी विषाणूची ओळख पटविण्यासाठी अत्यंत कमी चाचण्या करण्यात आल्या. रुग्णालयांकडे सुरक्षात्मक उपकरणांची कमतरता होती. मास्क परिधान करणे, सोशल डिस्टन्सिंग, क्वारेंटाईन आणि आयसोलेशनवरूनही राष्ट्रीय नेतृत्वाचा अभाव दिसून आल्याचे संपादकीयात म्हटले गेले आहे.
अमेरिकेत राजकारण
खाद्य आणि औषध प्रशासन, राष्ट्रीय आरोग्य संस्था तसेच रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्रांचे राजकीयकरण करून त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. याचमुळे अमेरिकेत हजारो लोकांचा अनाठायी मृत्यू झाला. यातून लोकांना आर्थिक त्रास आणि मानसिक संकटालाही सामोरे जावे लागले आहे. या विषाणूने अमेरिकेच्या गरीब समुदायाला सर्वाधिक त्रस्त केल्याचा आरोप संपादकीयात करण्यात आला आहे.









