ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोना संकट वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएल खेळण्यासाठी आलेले राजस्थान टीममधील लियाम लिव्हिंगस्टोन, आणि एन्ड्रयू टाय तर आरसीबीकडील एडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी आयपीएल अर्ध्यातून सोडून घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे. कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने आर.अश्विन यानेही आयपीएलमधून माघार घेतली आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स याने मात्र भारताला मदत करण्याचा निर्णय घेत पॅट कमिन्सने भारताला 50 हजार डॉलरची मदत केली आहे. याबाबत त्याने ट्विट करत त्याने माहिती दिली आहे.
पॅट कमिन्सने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, गेली अनेक वर्ष मी भारतामध्ये येत आहे आणि इथल्या लोकांनी मला खूप प्रेम दिले. एवढ्या जणांना त्रास होत असताना मलाही दु:ख होत आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असताना आयपीएल खेळवणं योग्य आहे का? असे प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत, पण लॉकडाऊनमध्ये असलेल्या असंख्य नागरिकांना या कठीण काळात थोडा तरी विरंगुळा मिळतो आहे.
अशा कठीण परिस्थितीमध्ये अनेकांना असहाय्य वाटू शकते. मलाही नजिकच्या काळात असे वाटले. पण हे आवाहन केल्यामुळे आपण आपल्या भावना कार्यात उतरवू शकतो आणि अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पाडू शकतो. माझी मदत ही फार मोठी नाही, पण यामुळे कोणाच्यातरी आयुष्यात नक्कीच फरक पडेल. ही निधी भारतातील रुग्णालयात ऑक्सीजन खरेदीसाठी असेल. तसेच माझ्या सहकाऱ्यांनाही मी मदतीचे आवाहन करतो, असेही पॅट कमिन्स यावेळी म्हणाला आहे.
पॅट कमिन्स हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. आयपीएल इतिहासातला कमिन्स हा दुसरा सगळ्यात महागडा परदेशी खेळाडू आहे. 2020 सालच्या आयपीएल लिलावात पॅट कमिन्सला केकेआरने 15.50 कोटी रुपयांना विकत घेतले होते.