शिक्षक ठरले ऑनलाईन सेलिब्रिटी : 39 लाख लोकांनी पाहिल्या चित्रफिती, राज्य सरकारच्या वाहिनीवर प्रसारण
वृत्तसंस्था/ कोची
कोरोना संकटादरम्यान केरळमध्ये चालू महिन्यात नव्या शैक्षणिक सत्राचा प्रारंभ सुरू झाल्यावर वर्गात घंटा वाजली नाही तसेच नव्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रमही आयोजित झाला नाही. यंदा पहिली ते 12 वीपर्यंतच्या लाखो विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरातच टीव्हीद्वारे शिक्षणाचे धडे गिरविण्यास प्रारंभ केला आहे. टाळेबंदीचे उल्लंघन न करता शालेय शिक्षण सुरू ठेवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहिला आहे.
युटय़ूबवरही चित्रफिती
या ऑनलाईन वर्गाला ‘फर्स्ट बेल’ नाव देण्यात आले असून त्याचे प्रसारण राज्य सरकारची शैक्षणिक वाहिनी ‘व्हिक्टर्स’वर करण्यात आले आहे. या वाहिनीची सुरुवात जुलै 2005 मध्ये झाली होती. एपीजे अब्दुल कलाम यांनी याचे उद्घाटन केले होते.
दोन आठवडय़ांसाठी प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले असून त्यातील त्रुgटी दूर केल्या जाणार आहेत. ऑनलाईन वर्ग झाल्यावर त्याचे पुनर्प्रसारणही होणार आहे. तसेच युटय़ूबही त्याच्या चित्रफिती अपलोड होतील. लवकरच डीटीएच आणि अन्य केबल सेवाप्रदात्यांनाही या चित्रफिती उपलब्ध केल्या जातील. लक्षद्वीपमध्ये केरळचा अभ्यासक्रम लागू असून तेथील 34 शाळांच्या 7 हजार 472 विद्यार्थ्यांना या ऑनलाईन वर्गाचा लाभ मिळाला आहे.









