शरीराला कोरोना झालेले लोक 15-20 दिवसानंतर पूर्णपणे बरे होतात.शरीराने आणि मनानेही! ते कुठेही खचल्याचे जाणवत नाही. कोरोनाशी मोठी लढाई जिंकून आल्याचे समाधान त्यांच्यात पहायला मिळते. मात्र ज्यांनी विनाकारण आपल्या मनाला कोरोनाची बाधा करुन घेतली आहे, अशा माणसांमुळे महामारी परवडली पण या लोकांचे वागणे मारक ठरले आहे.
सध्या देशासह गोव्यातही कोरोना महामारीचे दिवस असल्याने समाजामध्ये विलक्षण बदल दिसू लागले आहेत. महामारीच्या विळख्यातून कोणतेच क्षेत्र सुटलेले नाही. समाजविकासाचा पाया असलेल्या शिक्षणापासून ते देवधर्मापर्यंत, शेतीपासून उत्पादन-व्यापारापर्यंत आणि माणसांच्या मानसिकतेपासून राजकारणापर्यंत सर्वांनाच कोरोनाने ग्रासलेले आहे. अनेक देशांचे अविरत प्रयत्न सुरू असूनही अजूनही प्रतिबंधात्मक लस आलेली नाही. अशावेळी गोव्यात काहींच्या शरीराला कोरोना झाला आहे तर काहींच्या मनालासुद्धा कोरोना झाल्याचे दिसून येत आहे. शरीराला कोरोना झालेले लोक पंधरा-वीस दिवसानंतर पूर्णपणे बरे होतात. शरीराने आणि मनानेही! ते कुठेही खचल्याचे जाणवत नाही. कोरोनाशी मोठी लढाई जिंकून आल्याचे समाधान त्यांच्यात पहायला मिळते. मात्र ज्यांनी विनाकारण आपल्या मनाला कोरोनाची बाधा करून घेतली आहे, अशा माणसांमुळे महामारी परवडली पण या लोकांचे वागणे मारक ठरले आहे.
गोव्यात आतापर्यंत अनेकांनी मनाला कोरोनाची बाधा करून घेतली आहे. त्यामध्ये जनतेतील घटकही आहेत आणि सरकारातीलही आहेत. त्यामुळेच कोणीही कितीही बढाया मारल्या तरी कोरोनाचा फैलाव अजिबात आटोक्यात येत नाही. आपमतलबी, धंदेवाईक, बेजबाबदार, अनिर्बंध वागणाऱयांमुळे आज गोव्याचा संपूर्ण समाज कोरोनाच्या जीवघेण्या विळख्यात अडकला आहे. अनेकांचे बळी गेले आहेत, हजारो कोरोनाशी झुंजत आहेत. कोणाचा रोजगार गेला, कुणाचा बळी गेला, कोण जिवंत असूनही मृतप्राय झाला आहे तर दुसऱया बाजूने कोणी या महामारीतही संधीसाधूपणा करून स्वतःचा धंदा तेजीत कसा येईल यामध्ये मश्गूल आहेत.
महामारीचा कामगारवर्गाला सर्वात मोठा फटका बसला आहे. कुटुंबांच्या कुटुंबे घरातल्या घरात घुसमटत आहेत, अन्यायाच्या आगीत होरपळत आहेत. धंदेवाईकांनी त्यांच्या कंपन्यांचे साम्राज्य उभारुन देणाऱया कामगारांनाच काढून टाकले, काहींना अर्धपगारी ठेवले. अनेक वर्षांपासून खाणबंदीमुळे लाखो लोकांनी आपली आर्थिक मिळकत गमावलेली असतानाच आता कोरोनामुळेही मोठय़ा आर्थिक संकटाचा सामनाही गोवेकर करत आहेत. एरव्ही गलेलठ्ठ नफा उकळणाऱयांनी या संकटकाळात कामगारांना सांभाळले असते तर केवढे मोठे पुण्य त्यांना मिळाले असते जे तीर्थयात्रा करुन आणि सुवर्ण हिरे रत्नजडित देवाच्या दर्शनानेही मिळणार नाही. मात्र दुसऱया बाजूने फार माणुसकीने विचार करुन महामारीच्या काळात पूर्ण वेतन किंवा शिधा देणारेही उद्योजकही हाच गोवा पाहत आहे.महामारी भारतात, गोव्यात येऊ नये यावर काही आठवडय़ांचे लॉकडाऊन हा एकमेव रामबाण उपाय असल्याचा छातीठोकपणे सांगणाऱयांनी जेव्हा महामारीचा काहीच फैलाव नव्हता तेव्हा कडक लॉकडाऊन केले. जेव्हा फैलाव वाढला तेव्हा मात्र जनतेची मागणी असूनही कडक लॉकडाऊन केले नाही. लॉकडाऊनमुळे होणारी नुकसानी सोसता येत नसल्याचे कारण पुढे करुन सर्वांना रान मोकळे केले. त्यात काहींनी आपले हात व्यवस्थितरित्या धुऊन घेतले. रात्रीचे खेळ दिवसाही सुरु झाले. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीच्या नावाखाली खनिज वाहतूक, भंगारवाहतूक अन्य अनेक प्रकारही गोव्याने पाहिले. ‘इंपोर्टेड’ कोरोना रुग्णही पाहिले. इतरांची उदरनिर्वाहाची साधने बंद पण बडय़ा धेंडांनी स्वतःची मलई सुरू ठेवण्यासाठी जनतेला वेठीस धरल्याचेही गोवा पहात आहे.
कुणी काही खरेदी केलेच नाही, कुणी काही विकलेच नाही. म्हणजे आर्थिक-वाणिज्य परिभाषेत हा ‘शून्य व्यापार काळ’ ठरतो. त्यात कुणाला ना नफा ना तोटा. श्रेष्ठ उद्योजक रतन टाटा म्हणतात त्याप्रमाणे ‘हा काळ फायदा-तोटा बघण्याचा नाही, जिवंत राहण्याचा आहे. एकमेकाला मदत करुन जगण्याचा आहे. ज्यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून कंपन्या उभारल्या त्या कामगारांना वाऱयावर सोडणे म्हणजे महापाप आहे.’ पण प्रत्येक संधीचा फायदा घेणाऱयांना आणि महामारीचाही धंदा करणाऱया निर्दयींना टाटांचे म्हणणे कसे पटणार?
इतिहास ठरलेली अस्पृष्यता सध्या गोव्यात पहायला मिळत आहे. महामारीचा फैलाव रोखण्यासाठी केवळ दोन मीटरचे सामाजिक अंतर राखणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे, मात्र मनाला कोरोना लावून घेतलेल्यांनी संपूर्ण अस्पृश्यताच आरंभली आहे. वास्कोतील लोकांना कुठेच प्रवेश न देण्याचा नतद्रष्टेपणा गोव्यातील अनेक भागात सुरु आहे. तेथील प्रत्येक निष्पाप माणूस अस्पृश्य ठरवला जात आहे. अनेकांना नोकरीवरुन हाकलण्यात आले. अनेकजण वास्कोवासियांशी तुच्छतेने वागत आहेत. आता तर संपूर्ण गोव्यातच फैलाव झाला असून ही अस्पृश्यता गावांमध्ये, शहरांमध्ये एवढेच नव्हे तर वाडय़ावाडय़ावर पोहोचली आहे. दोन मीटरचे अंतर राखून सर्व व्यवहार करता येतात पण मनच कोरोनाग्रस्त झालेल्या शेजाऱयांनी एकामेकांकडे बोलणेच बंद केले आहे, कार्यालयांमध्येही कुणाचा कुणाशी आवश्यक संवादही होत नाही, उलट अनेक सरकारी, खासगी कार्यालयांमध्ये कोरोनावरुन भांडणेही होत आहेत.
पत्रकारांवर दोषारोप करणे, राज्यपालांना खोटे ठरवणे, राज्यपालांनी बेजबाबदारपणा उघडा पाडून पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करणे या साऱया घटना म्हणजे राजकीय क्षेत्रातील मनाला कोरोना झाल्याचा परिपाक आहे. अगदी मार्च महिन्यापासून कोरोनाबाबत जनजागृतीचे उत्कृष्ट काम पत्रकारितेतून होत असताना आता ऑगस्टमध्ये पत्रकारांनी जनजागृती करावी, असा उपदेश करणे म्हणजे काय म्हणावे. जनजागृती कधीच झालेली आहे. आता वाहनांना फलक लावून कसली जनजागृती? हा सगळा पोरखेळ आणि वायफळ खर्च कुणाच्यातरी स्वार्थासाठी चालला आहे, असा संशय जनतेला येणे स्वाभाविक आहे. रुग्णांना चांगले उपचार, सुविधा आणि तत्पर सेवा मिळणे याला प्राधान्य हवे. कोरोना रुग्णांची जराशीही आबाळ होणार नाही, एवढी काळजी घेतली पाहिजे. हे जसे प्रशासनाचे कर्तव्य आहे, तसेच ते जनतेचेही आहे. कोरोना ही जशी शरीराच्या प्रतिकारशक्तीची परीक्षा आहे, तशीच ती माणुसकीची, दातृत्वाचीही परीक्षा आहे.
राजू भि. नाईक








