चीनमधून बांधकाम साहित्य येणे बंद : तज्ञ अधिकारी वेळापत्रकानुसार पोचत नाही
प्रतिनिधी / मडगाव
कोरोना व्हायरस जगभरात पसरला आहे. या रोगाची सुरुवात चीनमधून झाली. त्याच चीनमधून नव्या झुवारी पुलासाठी सामान आणले जात होते. मात्र, आत्ता निर्बंध घातल्यामुळे नव्या झुवारी पुलाच्या कामावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात या पुलाचे काम सुरू ठेवले असते तर ते बऱयापैकी पुढे गेले असते. पण, सद्या आवश्यक साहित्य पोचू शकत नसल्याने पुलाचे काम यापुढेही रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चीनमधून येणारे साहित्य तसेच देखरेखीची यंत्रणा आणि तज्ञ वेळापत्रकानुसार पोचू शकत नाही. केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या व्हिसा रद्दबातल निर्णयामुळे आणि प्रभावित देशांवरील प्रवास बंदीमुळे पुलाचे काम रखडले आहे.
कोरोनाव्हायरसचा उदेक झाल्यामुळे समस्या
दिलीप बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडचे उपसंचालक अतुल जोशी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, ‘सध्या सुरू असलेल्या झुवारी पूल प्रकल्पासाठी आवश्यक असणारी महत्त्वाची सामग्री चीनकडून येत होती. पुलाच्या सुपरस्ट्रक्चरमध्ये पाईप्स बसविणे, मॉनिटरिंग सिस्टम हे सर्व काही चीनमधूनच घ्यावे लागेल, परंतु कोरोनाव्हायरसचा उदेक झाल्यामुळे ते याक्षणी येणार नाही.’
चिनबरोबरच फ्रान्समधील तज्ञनही नाही
ते म्हणाले की, हा एक निर्णायक क्षण आहे, तज्ञांनी आणि साहित्याने त्यांच्या भावी योजनांनुसार वेळापत्रकानुसार पुढे जाणे आवश्यक होते. नवीन वेळापत्रकांबाबत अधिक स्पष्टता येईपर्यंत ते किती काळ लागेल हे सांगू शकत नाही. पुलाच्या कामाच्या गतीवर याचा परिणाम होईल हे त्यांनी निश्चित केले. ते पुढे म्हणाले की, चीनमधून येणाऱया अभियंत्यांसह साहित्य आणि तज्ञ यांच्यासह फ्रान्समधील तज्ञही येथे येऊ शकत नाहीत.
जर सर्व साधनसामुग्री उलपब्ध असती तर लॉकडाऊनच्या काळात पुलाचे काम बऱयापैकी पुढे गेले असते. लॉकडाऊनमुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी नव्हती. अवघीच वाहने ये-जा करायची. ही वाहने एअरपोर्ट रोडद्वारे वळविणे शक्य होते. तसेच कामगारवर्ग देखील पुलाच्या साईटवरच राहिले असते किंवा त्यांना सुरक्षित स्थळी ठेऊन त्यांच्याकडून काम करून घेणे शक्य होते.
या पुलाचे 30 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. तसेच पुलाचे काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले होते. मात्र, आत्ता कोरोना व्हायरसमुळे पुलाचे काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण होणे अशक्यप्राय बाब बनली आहे.









