ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोना संकटाला तोंड देत 24 तास अहोरात्र रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलीस बांधवांना सलाम करीत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता कोथरुड-वारजे परिसरातील अश्विनी छत्रपती, हर्षद छत्रपती या दांम्पत्याने यांनी 100 पोलिसांना आंब्याच्या पेटयांची अनोखी भेट दिली. ख-या अर्थाने कोरोना योद्धे असलेल्या या पोलिसांना स्वत:च्या कुटुंबासोबत आंबे खात आनंदाचे दोन क्षण अनुभविता यावे, हाच यामागील उद्देश.
वारजे पोलीस स्टेशन व वारजे वाहतूक पोलीस विभाग येथील अधिकारी व कर्मचारी वर्गाला आंब्याच्या पेटया भेट देण्यात आल्या. वारजे पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी अशोक कदम, अरविंद रासकर, संतोष भापकर आदी उपस्थित होते.
अशोक कदम म्हणाले, पोलीस दलातील कर्मचारी ज्या अवघड परिस्थिती मध्ये कर्तव्य पालन करत आहेत, त्याची जाण ठेवून दिलेली ही भेट अत्यंत वेगळी आहे. ऐन उन्हाळ्यात प्रत्येकजण आपापल्या कुटुंबासमवेत आंबे खाण्याचा आनंद घेत असतो. मात्र, पोलीस बांधव यापासून दूर होते. ही भेट मिळाल्याने आम्हा पोलिसांना समाजातून आवश्यक पाठिंबा मिळाला आहे.








