कोरोनाच्या महामारीला आता तीन साडेतीन महिने झाले आहेत. आजही या भयानक रोगाच्या भीतीने वैज्ञानिकांपासून ते सामान्य माणसांपर्यंत सर्वच जणांना भीतीने ग्रासले आहे. गोंधळून टाकले आहे, पुढे किती दिवस याचे परिणाम भोगावे लागतील, याची आजमितीला तरी कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. जगातील प्रगत राष्ट्रांसहित सर्व देश यातून बाहेर कसे पडायचे या विवंचनेत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (sंप्ध्) पण जाहीर केले आहे की, या कोरोनाबरोबर सर्वांनी जगण्याची सवय करून घेतली पाहिजे.
आजच्या माहितीनुसार जगामध्ये जवळजवळ 73 लाख लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे व 4 लाखापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत. या महामारीमध्ये सर्वात आघाडीवर (चांगल्या अर्थाने नव्हे दुर्दैवाने) सर्वात पुढे आहे ती अमेरिका. वैज्ञानिक, तांत्रिक, आर्थिक अशा सर्वच दृष्टीने पुढे असलेल्या या देशामध्ये सर्व जगाच्या अर्ध्या म्हणजे जवळ जवळ 36 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्याचप्रमाणे 2 लाखापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत.
सर्वच जगामध्ये कोरोनामुळे करोडो लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. अमेरिकेमध्ये जवळजवळ साडेतीन कोटीच्या आसपास लोकांनी आपल्या नोकऱया, व्यवसाय, उत्पन्नांची अनेक साधने गमावली आहेत. काही ठिकाणी तर दोन वेळचे अन्न मिळविण्यासाठी कुटुंबासहित लोक अन्नछत्राच्या बाहेर ताटकळत उभे आहेत. काही ठिकाणी मर्यादित स्वरुपात काही नियमांचे पालन करत व्यवहार करण्याची मुभा देण्यात आली आहे. पण कोरोनाबाधितांचा व मृत्युमुखी पडणाऱया नागरिकांचा आकडा वाढतच आहे. भरीस भर म्हणून येथील वैज्ञानिक इशारा देत आहेत. की, कोरोनाची दुसरी लाट परत येण्याचीही नजीकच्या काळात म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या दरम्यान शक्मयता आहे. दुसरीकडे लस निर्माण करण्यात अजून तरी यश आलेले नाही. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार कमीत कमी या वर्षाअखेरपर्यंत या लसीसाठी सामान्य लोकांना वाट पहावी लागणार आहे. हे सर्व लिहिण्याचे कारण लोकांच्या मनात आणखी भीती निर्माण करणे नसून कोरोनामुळे जगातील सर्व प्रगत राष्ट्रांसहीत अन्य अनेक राष्ट्रेही किती हतबल व असहाय्य झाली आहेत हे दर्शविणे आहे.
मागच्या आठवडय़ात आम्ही एका नातेवाईकांना भेटायला गेलो असता न्यूयॉर्कमधील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये काम करणाऱया नर्सशी आमची भेट झाली. तिने गेल्या तीन महिन्यात शेकडो कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करताना आलेले आपले अनुभव सांगितले. तिथे स्वत:च्या डोळय़ांनी रुग्ण असहाय्यपणे तडफडत मृत्यूला कवटाळताना पाहिल्याचेही सांगितले. तिच्या 30 वर्षांच्या नोकरीच्या काळात इतके भयानक, हृदयद्रावक प्रसंग तिने कधी पाहिले नाहीत. एवढेच नाहीतर आम्हाला काही प्रसंग सांगताना तिच्या अंगावर रोमांच उभे रहात होते व डोळय़ात अश्रू वाहात होते. तिचे अनुभव ऐकताना आमच्याही अंगावर शहारे येत होते व थोडेसे भयही वाटत होते. भय याचे की एक ना एक दिवस कोरोना नाही तर आणखी कोणत्या कारणाने का असेना आपल्यालाही अशाच प्रसंगाला म्हणजे मृत्यूला सामोरे जावे लागणार आहे. लोक मृत्यूला किती सहजपणे घेतात पहा. मराठीत एक म्हण आहे, ‘जात्यातले रडतात, सुपातले हसतात.’ आज या म्हणीचा अनुभव येत होता. आज कोरोनाच्या व्याधीमुळे त्रस्त असलेले रुग्ण, मृत्यूमुखी पडणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक दु:ख भोगत रडत आहेत त्यांची अवस्था जात्यातल्या रडणाऱयासारखी आहे व इतर लोक मी किती सुदैवी आहे, माझी प्रतिकार शक्ती किती चांगली आहे, मी सगळय़ा नियमांचे पालन करतो आहे, मला काय होणार आहे अशा भ्रमात राहून सुपातल्या दाण्यासारखे हसत आहेत. जणू काही आपण अमरत्वाचे वरदान घेऊनच जन्मला आलो आहे व आपला मृत्यू कधीच होणार नाही अशी त्यांची समजूत आहे. कोणी जवळचा नातेवाईक किंवा मित्राचा मृत्यू झाला तर थोडे दिवस स्मशानवैराग्य येते, पण कारांतराने तेही निघून जाते. पण या कोरोना महामारीने आपणाला शिकविले आहे. की, ज्या विज्ञानावर आपण अवलंबून होतो ते विज्ञानसुद्धा निसर्गासमोर हतबल झाले आहे. आपल्याला असे वाटत होते की, विज्ञान काहीही करू शकते. काही प्रमाणात ते खरे आहे पण कायमचे आपल्याला जन्म, म्हातारपण, आजार व मृत्यूपासून मुक्त करू शकत नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. sंप्ध् च्या माहितीनुसार आतापर्यंत जगात 10 भयानक महामारीची संकटे आली. एका वर विज्ञानाने मात करताच पुन्हा दुसरे संकट उद्भवले. शेवटी निसर्गाचा विजय होतो हा आजवरचा अनुभव आहे. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी काही सामान्य वाटणाऱया समस्यादेखील तथाकथित विज्ञानाने सोडविल्या नाहीत म्हणून कोरोनाच्या निर्मात्याने विज्ञानाचे पितळ उघडे पाडले म्हणण्याचे धाडस करावे, असे वाटते.
मी काही वैज्ञानिक नाही. एक साधा कॉमर्सचा पदवीधारक आहे पण अनुभवावरून हे निश्चितच सांगू शकतो की, विज्ञानाने आपले काही मूलभूत प्रश्न सोडविले नाहीत व कधी सोडवूही शकणार नाही. पुढे जाऊन मी हेही म्हणण्याचे धाडस करीन की या समस्या सोडविण्याचे सामर्थ्य विज्ञान कितीही प्रगत झाले तरी ते शक्मय नाही. कोरोनाने विज्ञान ही सुद्धा एक ‘अंधश्रद्धा’ आहे, हे सिद्ध केले आहे.
या निष्कर्षाला येण्याचे कारण म्हणजे त्या नर्सनी सांगितलेला हृदय पिळवटून टाकणारा एक प्रसंग. एका रुग्णाबद्दल सांगताना डोळय़ात पाणी आणत, ओठ थरथरत तिने आम्हाला जो प्रसंग सांगितला त्यामुळे जीवनाकडे व विज्ञानाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून गेला.
नर्स म्हणाली, एक चाळीशीतला विवाहित तरुण, एक मुलगा व एक मुलगी असलेला सुखी संसार, चांगल्या पगाराची नोकरी, आलिशान सर्व सुखसोयीनी युक्त असा अद्ययावत महालासारखा बंगला, सर्व सुखे त्याच्या पायाशी लोळण घेत होती. पण अचानक त्याला ताप आला, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये आला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला
ऍडमिट करण्यात आले. कोरोनाची लक्षणे दिसत होती. म्हणून पत्नी आणि मुलांपासून त्याला दूर ठेवण्यात आले. 5 दिवसात त्याची परिस्थिती अधिक गंभीर झाली. तो बेशुद्ध अवस्थेत जाण्याची लक्षणे दिसू लागली. त्यावेळी नियमाप्रमाणे त्याला सांगण्यात आले की, आता शेवटचा उपाय म्हणून व्हेंटीलेटरवर ठेवावे लागेल. तसे त्याच्या कुटुंबीयांनाही कळविण्यात आले. पण त्यांनाही कोरोनाची लागण होईल म्हणून हॉस्पिटलमध्ये बंदी होती. त्या नर्सला तो प्रसंग आठवला व ती रडत आसरा घेऊन खुर्चीत बसली. ती म्हणाली, रुग्णाने तिला व डॉक्टरला विचारले, ‘माझे आता काय होणार? मला मृत्यू येणार का? मग तो नर्सचा हात हातात घेऊन म्हणाला, ‘मी मृत्यूच्या जवळ असेन तर काय करावे?’ हा प्रश्न ऐकून डॉक्टर व नर्स दोघेही स्तब्ध झाले. (क्रमश:)
थेट अमेरिकेतून / वेंकटेश पतकी









