येत्या 15-20 दिवसात देशात रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाच्या संक्रमणाचा वेग सातत्याने वाढत असून गुरुवारी दिवसभरात 81 हजारहून अधिक रुग्ण सापडले. तसेच 469 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता नजिकच्या काळातही कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून येत्या 15 ते 20 दिवसात नव्या बाधितांचा विस्फोट होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. या धोक्यामुळे केंद्र सरकारच्यावतीने पुन्हा एकदा कोरोना नियमावलीचे कडक पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यांच्या मुख्य सचिवांशी संवाद साधत नव्या दिशानिर्देशांबाबत मार्गदर्शन केले. तसेच संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक सर्व सावधगिरीच्या उपाययोजना करण्यासह बजावले आहे.
गेल्या सहा महिन्यानंतर (182 दिवस) कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक नोंदवला आहे. देशात गेल्या चोवीस तासात 81 हजार 466 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यापूर्वी बुधवारी देशात 72 हजार 330 रुग्ण सापडले होते. गेल्या दोन दिवसांचा विचार करता नव्या रुग्णांमध्ये जवळपास 10 हजारनी भर पडलेली दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मणिंद्र अगरवाल यांनी गणितीय मॉडेलच्या आधारे काही निरीक्षणे नोंदवली आहेत. या निरीक्षणांमध्ये येत्या पंधरवडय़ात कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 15 ते 20 दिवसात दररोज 80 ते 90 हजार नव्या कोरोना रुग्णांची भर पडू शकते. ही आकडेवारी यापेक्षाही जास्त असू शकते. पंधरवडय़ानंतर यात घसरण होण्याची शक्मयता अग्रवाल यांनी व्यक्त केली.
लसीकरणाला गती
देशभरात गुरुवारपासून 45 वर्षांवरील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशात कोरोना रुग्णांची रोज चिंताजनक वाढ होत असतानाच केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आणि खासगी लसीकरण केंद्रांवर एप्रिल महिन्यामध्ये राजपत्रित सुट्टीसह सर्व सुट्टय़ांच्या दिवशीही लसीकरण केले जाणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. देशात गुरुवारपर्यंत 6 कोटी 87 लाख 89 हजार 138 जणांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. नुकत्याच 1 एप्रिलला सुरुवात झालेल्या तिसऱया टप्प्यात पहिल्याच दिवशी देशात 36 लाख 24 हजार जणांनी कोरोनाची लस घेतल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड, कर्नाटकात चिंता वाढली
केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी रविवारी विविध राज्यांच्या आरोग्य सचिवांशी व्हर्च्युअल पद्धतीने संवाद साधला. यावेळी त्यांनी वाढत्या कोरोना संसर्गाबाबत चिंता व्यक्त करतानाच आरोग्य सुविधांसंबंधीचाही आढावा घेतला. सर्वाधिक रुग्ण सापडणाऱया 8 राज्यांमध्ये 81 टक्के रुग्ण असणे चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षातील परिस्थितीचा विचार करता सध्याची परिस्थिती महाभयंकर असल्याचा दावा करत त्यांनी आकडेवारीही मांडण्याचा प्रयत्न केला.
मध्यप्रदेशात चार जिल्हय़ात लॉकडाऊन
मध्य प्रदेशात कोरोनाग्रस्तांची वाढ लक्षात घेत चार जिल्हय़ांच्या काही भागात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. छिंदवाडा, रतलाम, बेतूल आणि खारगोन या जिल्हय़ांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. तसेच संसर्ग वाढलेल्या अन्य काही ठिकाणी नाईट कर्फ्यूसह कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.
दिल्लीकरांना केजरीवाल यांचे हात जोडून कळकळीचे आवाहन
दिल्लीत गेल्या दोन दिवसात संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. मात्र, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत लॉकडाऊन लागू करणार नाही, असे शुक्रवारी स्पष्ट केले. मात्र “कृपया सर्वांनी मास्कचा वापर करावा आणि नियमावली पाळावी’’ असे कळकळीचे आवाहन त्यांनी दिल्लीकरांना केले आहे. शुक्रवारच्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये दिवसभरात 3 हजार 594 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. या नव्या रुग्णसंख्येमुळे दिल्लीत आजपर्यंत सापडलेल्या एकूण बाधितांचा आकडा 6 लाख 68 हजार 814 इतका झाला आहे. दिल्लीमध्ये वाढत असलेली रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असल्याचे सांगत राज्याबाहेरून येणाऱयांनीही दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली आहे.









