डी 614 जी नामकरण : ब्रिटनच्या संशोधकांचा दावा : जगभरात 1 कोटी 12 लाख 16 हजार 897 बाधित
कोविड-19 च्या ट्रकिंगदरम्यान ब्रिटनच्या संशोधकांनी विषाणूचे एक नवे रुप (स्ट्रेन) शोधून काढले आहे. विषाणूचे नवे रुप महामारी फैलावण्यात जुन्या विषाणूपेक्षाही वरचढ आहे. या नव्या रुपाला ‘डी614जी’ नाव देण्यात आले आहे.
विषाणूच्या जीनोम सिक्वेंसचे विश्लेषण करण्यात आले असता वर्तमानातील कोरोनापेक्षा अधिक संसर्ग फैलावण्याची क्षमता असल्याचे दिसून आले आहे. परंतु दिलासा देणारी बाब म्हणजे नव्या रुपातील विषाणूच्या संसर्गानंतर प्रकृतीची स्थिती अधिक गंभीर होणार नाही.
स्पाइक प्रोटीनमध्ये बदल
संशोधनात सामील शेफिल्ड विद्यापीठानुसार नव्या स्ट्रेनमध्ये मानवी पेशींना संक्रमित करण्याची क्षमता अधिक असून पूर्ण जगात जुन्या विषाणूची जागा तो घेत आहे. याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये किंचित बदल दिसून आला आहे. याचा वापर करून विषाणू मानवी पेशींमध्ये प्रवेश करून संसर्ग फैलावतो.
10 हजारांहून अधिक सिक्वेंस
श्वसनाशी संबंधित समस्येला तोंड देणाऱया कोरोनाबाधितांमध्ये नव्या स्ट्रेनचा व्हायरल लोड अधिक दिसून आला आहे. यातून हा विषाणू अधिक लोकांना संक्रमित करू शकत असल्याचे स्पष्ट आहे. संशोधनादरम्यान याचे 10 हजारांहून अधिक सिक्वेंस मिळाले आहेत. ही अत्यंत महत्त्वाची माहिती असून संशोधनादरम्यान मोठय़ा प्रमाणात खबरदारी बाळगावी लागली आहे. संशोधकांचे पथक काही वेळ विषाणूच्या संपर्कात राहिले होते. कोरोनाचे स्ट्रेन किती पातळीपर्यंत म्युटेट होतात हे पाहण्यासह नव्या स्ट्रेनवर नजर ठेवली जात असल्याचे डॉ. विल फिशन यांनी सांगितले.
नवा स्ट्रेन विकसित

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर मेक्सिकोच्या लॉस अल्मॉस नॅशनल लॅब, उत्तर कॅरोलिनाच्या डय़ूक विद्यापीठ आणि इंग्लंडच्या शेफिल्ड विद्यापीठाने संयुक्तपणे संशोधन केले आहे. महामारीच्या प्रारंभीच कोरोनाच्या जीनोमचे सिक्वेंसिंग केले. यादरम्यान कोरोनाने म्युटेट होत स्वतःचा नवा स्ट्रेन तयार केला असून तो वेगाने जगभरात फैलावत असल्याचे आढळून आल्याची माहिती संशोधक थुसान डिसिल्व्हा यांनी दिली आहे.
अध्यक्षांच्या विशेष प्रतिनिधीचा मृत्यू

आर्थिक विकास आणि गरिबी निर्मूलन विषयक अफगाणिस्तानच्या अध्यक्षांचे विशेष प्रतिनिधी यूसुफ गजंफर यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. गजंफर यांच्यावर तुर्कस्तानात उपचार सुरू होते. काबूलमधील अध्यक्षीय प्रासादात कार्यरत अनेक कर्मचाऱयांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अध्यक्ष अशरफ गनी यांनीही कोरोना चाचणी करवून घेतली आहे. परंतु त्यांचा अहवाल प्रत्येकवेळी निगेटिव्ह आला आहे. अफगाणिस्तानात आतापर्यंत 32,000 बाधित सापडले असून 819 जणांचा मृत्यू ओढवला आहे.
ब्राझील : संकट तीव्रच

ब्राझीलमध्ये मागील 24 तासांमध्ये 42 हजार 223 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील रुग्णांचे एकूण प्रमाण आता 15,43,341 वर पोहोचले आहे. तर एक दिवसापूर्वी ब्राझीलमध्ये 48 हजार 105 नवे रुग्ण सापडले होते. देशात आतापर्यंत 63,254 बाधित दगावले आहेत. कोरोना विषाणूमुळे अमेरिकेनंतर ब्राझीललाच सर्वाधिक फटका बसला आहे.
अमेरिका : श्वानाला लागण

अमेरिकेच्या जॉर्जिया प्रांतात एका श्वानाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली आहे. अमेरिकेच्या कुठल्याही प्राण्यामध्ये कोरोनाची लागण होण्याचे दुसरे प्रकरण आहे. या पाळीव श्वानाचा मालक काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह सापडला होता. वैद्यकीय पथकांचे एक पथक श्वानाच्या प्रकृतीवर नजर ठेवून असून विशिष्ट उपचारांची तयारी करण्यात आली आहे.
डब्ल्यूएचओचे आवाहन

जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना ‘उठा आणि विषाणूवर नियंत्रण मिळवा’ असे आवाहन केले आहे. लोकांना जागं व्हावं लागेल. आकडेवारी खोटं बोलत नाही, वस्तुस्थितीकडे अनेक देश दुर्लक्ष करत आहेत. ही समस्या चमत्काराच्या स्वरुपात आपोआप संपुष्टात येणार नसल्याचे उद्गार जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागाचे संचालक मायकल रेयान यांनी काढले आहेत. संकट अद्याप संपलेले नसल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
अमेरिकनांसाठी अट

ब्रिटन सरकारने शुक्रवारी रात्री 59 देशांच्या नागरिकांना दिलासा दिला आहे. या देशांमधून येणाऱया नागरिकांना आता विलगीकृत व्हावे लागणार नाही. परंतु हा दिलासा त्यांच्या चाचणीवर निर्भर असणार आहे. विशेष बाब म्हणजे या यादीत अमेरिका सामील नाही. अमेरिकेतून येणाऱया लोकांना विलगीकरणाचे पालन करावे लागणार आहे.
विदेशी मंत्री पॉझिटिव्ह

पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ज्वराची लक्षणे दिसून आल्याने स्वतःला विलगीकृत केले आहे. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने घरातूनच काम करणार असल्याचे कुरैशी यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या दोन माजी पंतप्रधानांसह रेल्वेमंत्री शेख रशीद आणि अन्य काही नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.









