नव्या अहवालामुळे जगभरात खळबळ, आधी संशोधकच बाधित झाल्याचे उघड
बीजिंग / वृत्तसंस्था
जगभर धुमाकूळ घालणारा कोरोना विषाणू हा मानवनिर्मिती नसून नैसर्गिक आहे, अशी समजूत करुन देण्याचा प्रयत्न मध्यंतरीच्या काळात केला गेला आहे. तथापि, यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या तज्ञांच्या नव्या अहवालात हा विषाणू मानवनिर्मित असून त्याची निर्मिती चीनच्या वुहान शहरातील प्रयोगशाळेत करण्यात आली आहे, ही बाब स्पष्ट होत आहे. यासंबंधी एका अहवाल काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. आता नवा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
कोरोनाचा पहिला उद्रेक होण्याच्या एक महिनाभर आधी वुहानच्या प्रयोगशाळेतील काही संशोधकांना या विषाणूची बाधा झाली होती. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले होते, असा गौप्यस्फोट आता झाला आहे. यावरून हा विषाणू चीनमध्येच बनल्याचे स्पष्ट होते असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त पेले आहे. यामुळे चीनची कोंडी होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतील वॉलस्ट्रीट जर्नल या नियतकालिकात हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यासाठी अमेरिकेच्याच गुप्तचर संस्थांच्या अहवालाचा आधार घेण्यात आला आहे. नव्या अहवालात काही अशा बाबी उघड करण्यात आल्या आहेत, की ज्यामुळे कोरोनाच्या जन्माची पुन्हा सखोल चौकशी होण्याची आवश्यकता निर्माण झाली असून चीनवरील संशय आता अधिक दाट होत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेची कोरोना जन्मस्थान संशोधनाच्या संदर्भातील पुढची बैठक येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. त्याआधी हा नवा अहवाल प्रसिद्ध झाल्याने तपासाची दिशा चीनकडेच राहणार हेही उघड झाले.
प्रारंभीच्या दिवसांमध्ये…
कोरोनाचा जगातील पहिला रुग्ण डिसेंबर 2019 मध्ये दिसून आला. वुहानमधील ज्या प्रयोगशाळेतून हा विषाणू जगभर पसरला त्या प्रयोगशाळेतील काही संशोधक पहिला रुग्ण सापडण्याच्या महिनाभर आधीच या विषाणूने बाधित झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याचाच अर्थ असा की चीनला हा विषाणू पसरत असल्याची माहिती आधीपासूनच होती. ती त्याने जगापासून लपविली. त्यामुळे जगभरात कोरोनाचा प्रसार झाला या आरोपाला पुष्टी देणारा हा अहवाल असल्याचे तज्ञांचे मत आहे.
निसर्गावर मात करण्यासाठी…
चीनच्या वुहान शहरात जैव तंत्रज्ञानाचे संशोधन करणाऱया अनेक प्रयोगशाळा असून त्या निसर्गावर मात करण्यासाठी कृत्रिम विषाणू तयार करण्याचे प्रयोग गेल्या 25 वर्षांपासून करीत आहेत. हा जगावर जैवयुद्ध लादण्याचा प्रयत्न आहे. अशाच प्रयत्नात कोरोनाचा जन्म झाला आहे, असा जगप्रसिद्ध तज्ञांचा आरोप आहे. कोरोना विषाणूच्या जनुकीय संरचनेतून हा विषाणू नैसर्गिक असल्याचे दिसत नाही. तो मानवनिर्मितच आहे, असा निष्कर्ष काही तज्ञांनी काढला असून चीनकडे संशयाची सुयी आता स्थिरावू लागली आहे, असे म्हटले जाते.
चीनकडून इन्कार
चीनकडून आरोपांचा इन्कार करण्यात आला होता. कोरोना विषाणू नैसर्गिक असून वटवाघळांमध्ये त्याचे उगमस्थान आहे. तेथून तो मानवाच्या शरीरात पसरला असा चीनचा दावा आहे. तथापि, गेल्या महिन्याभरात उघडकीस आलेल्या माहितीमुळे चीनचा दावा लंगडा पडत असल्याचे स्पष्ट होत आहे.
बायडन प्रशासनाकडून दबाव
अमेरिकेचे नवे अध्यक्ष जोसेफ बायडन यांच्या प्रशासनाने चीनवर दबाव आणण्यास प्रारंभ केला आहे. कोरोना विषाणूची निर्मिती कशी झाली या प्रश्नाच्या संशोधनात चीनला पूर्ण सहकार्य करावे लागेल. या विषाणूची निर्मिती चीनमध्येच झाली असल्याचा संशय बळावत असून अमेरिका या प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही अमेरिने दिला आहे.
ड कोरोना विषाणूचा जन्म निसर्गावर मात करण्याच्या नादात
ड कोरोनाचा प्रसार हे चीनचे जैवयुद्धच, तज्ञांचा गंभीर आरोप
ड प्रामाणिक चौकशीसाठी अमेरिकेच्या बायडन प्रशासनाचा दबाव









