देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. केंद्रातील मोदी सरकार कोरोना विषाणूचे संकट रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. कोरोना महामारीच्या विरोधात नरेंद्र मोदी सरकारने आता तीन टप्प्यांची योजना आखली आहे. केंद्राने कोविड-19 च्या विरोधातील लढय़ासाठी राज्यांना पॅकेज उपलब्ध केले आहे. या पॅकेजला इमर्जन्सी रिस्पॉन्स अँड हेल्थ सिस्टीम प्रिपेअरनेस नाव देण्यात आले आहे. या पॅकेजमध्ये केंद्राकडून 100 टक्के योगदान देण्यात आले आहे. तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठविण्यात आलेल्या पत्रात 3 टप्प्यातील योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात कोविड-19 च्या उपचाराकरता रुग्णालय विकसित करणे, आयसोलेशन ब्लॉक तयार करणे, व्हेंटिलेटरची सुविधा असलेले आयसीयू निर्माण करणे, पीपीई-एन95 मास्क-व्हेंटिलेटर्सच्या उपलब्धतेवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. तसेच लॅब नेटवर्क्स आणि डायग्नोस्टिक सुविधा निर्मितीवर भर दिला जाणार आहे. तसेच निधीचा वापर सर्व्हिलान्स, महामारीच्या विरोधात जागरुकता निर्माण करण्यासाठी केला जाईल. निधीचा एक हिस्सा रुग्णालये, शासकीय कार्यालये, जनसुविधा तसेच रुग्णवाहिकांना संसर्गमुक्त करण्यावर खर्च केला जाणार आहे.
हा प्रकल्प केंद्र आणि राज्यांमधील अनेक टप्प्यांच्या चर्चेनंतर समोर आला आहे. राज्य सरकारांकडून कोविड-19 महामारीच्या विरोधात लढण्यासाठी सातत्याने विशेष पॅकेजची मागणी केली जात आहे.
दुसऱया आणि तिसऱया टप्प्प्यात काय केले जाणार याचा खुलासा मात्र अद्याप झालेला नाही. या टप्प्यांमधील उपाययोजना बऱयाचअंशी तत्कालीन स्थितीवर अवलंबून असणार आहे.









