आणखी 73 दिवसांनी कोरानावरची कोव्हिडशिल्ड ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे आणि सर्व भारतीयांना ती मोफत मिळणार अशी आनंद वार्ता आली आहे. विशेष म्हणजे या लसीचे उत्पादन आपल्या देशात महाराष्ट्रात सिरमकडून होणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने संशोधित व विकसित केलेली ही लस पहिल्या दोन चाचण्यात यशस्वी ठरली असून अंतिम चाचणी व अनुमती मिळाली की ही लस जगात सर्वांना उपलब्ध होणार आहे. या लसीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. या लसीच्या ज्या चाचण्या झाल्या आहेत, त्याचे रिझल्ट उत्तम आहेत. 90 टक्के जणांना कोणतेही साईड इफेक्ट झालेले नाहीत. 10 टक्के जणावर सौम्य साईड इफेक्ट जाणवले. अनेकांना लसीचा एक डोस पुरेसा व परिणामकारक ठरला आहे. त्यांच्या शरीरात ऍन्टीबॉडीज तयार होऊन कोरोनावर मात करण्याची शक्ती प्राप्त झाली असे दिसून आले आहे. आता लसीच्या उत्पादनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये लसीची निर्मिती सुरु होईल आणि आजपासून 73 दिवसांनी लस सर्वासाठी उपलब्ध करुन दिली जाईल. या लसीची तिसरी चाचणी 22 ऑगस्टला सुरु झाली आणि ती यशस्वी होणार असा आत्मविश्वास व्यक्त होत आहे. भारतातही या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. या लसीच्या अंतिम चाचणी यशस्वीतेनंतर अवघे जग ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत आहे, ते कोरोना युद्ध जिंकण्याचा लढाईचा अंतिम टप्पा सुरु होईल. पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीअखेर जगात बहुतेक सर्वाना लस उपलब्ध होईल आणि कोरोनावर मात करुन अवघे विश्व सुस्कारा सोडेल, मुक्त श्वास आणि मुक्त संचार सर्वाना लाभेल असे चित्र आहे. पुण्यात पूनावाला यांची सिरम इन्स्टिटय़ूट ही जगातली सर्वात मोठी लस उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार करून मोठी गुंतवणूक करुन अखंड मेहनत करत कोव्हिशिल्डसाठी तयारी केली आहे. ऑक्सफर्डप्रमाणेच आणि काही कंपन्या आणि अमेरिकेप्रमाणे आणि काही देश कोरोना लसीवर काम करत आहेत. रशियाने तर लसीची घोषणा व लस देण्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. ओघानेच आणखी 73 दिवसांनी कोरोना लढाई अंतिम पर्व गाठेल व मानव ही लढाई आगामी मार्च महिन्यात पूर्णांशाने जिंकेल असे दिसते आहे. ही लस सर्वाना मिळावी, लस वितरणात गरीब-श्रीमंत असा भेद होऊ नये. गरजूना व गरीब लोकांना, देशांना ती मिळावी यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रयत्न चालले आहेत. त्यासाठी त्यांनी रचनात्मक व संघटनात्मक काम सुरू केले आहे. जगातले 75 देश त्यासाठी एकत्र आले आहेत. भारत ही लस भारतीयांना मोफत देईल असे दिसते आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत मोफत लसीचा कार्यक्रम राबवला जाईल, अशी योजना आहे. सिरम इन्स्टिटय़ूटचे प्रमुख पूनावाला यांनी लस महाग विकून नफा मिळवावा असा हेतू नाही आणि लस उत्पादन गतीने व पुरेसे करण्यात सिरम कमी पडणार नाही. सिरम ही लस भारत व जगभरच्या 90 देशांना पुरवणार आहे. त्यासाठीचे करार व योजना, गुंतवणूक सिरमने केली असल्याचे म्हटले आहे. ओघानेच सिरमची ही कामगिरी इतिहासात नोंद होईल हे वेगळे सांगायला नको. जग अडचणीत, संकटात होते तेव्हा कोणता देश काय करत होता, कोण कुरापती काढत होते, कुणाला नकाशे बदलण्याची व घुसखोरी व युद्धाची खुमखुमी होती. आणि भारत काय करत होता, याचा इतिहास लिहिला जाईल. तेव्हा भारत, पुणे, सिरम व पूनावाला यांचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदले जाईल. आणि अनेक लोक त्याचा गौरवाने उल्लेख करतील हे स्पष्ट आहे. भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे. सिरमकडून 68 कोटी डोस भारत सरकार घेणार आहे. या उर्वरित दोन कंपन्यांना ही संधी मिळेल हे स्पष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाला लालकिल्ल्यावरून भाषण करताना सरकार लसीकरणासाठी तयार आहे. लस तयार झाली, देण्यास हरकत नाही असा शास्त्रज्ञांनी हिरवा कंदील दाखवला की लसीचे वितरण व ती देण्याची व्यवस्था व त्याचा सर्व आराखडा, योजना तयार आहे असे म्हटले होते. एका अर्थी हा कोरोना युद्ध जिंकण्याचा संकेत आहे. पण आजच जी बातमी आली आहे त्यानुसार भारत जगात सर्वाधिक रुग्णसंख्येच्या क्रमवारीत तिसऱया क्रमांकावर पोहोचला आहे. हळूहळू निर्बंध कमी केले जात आहेत आंतर जिल्हा, आंतर राज्य वाहतूक, प्रवास, बसेस यांना परवानगी मिळणार अशी चिन्हे आहेत. वाढती रुग्णसंख्या, कोरोनाचा घट्ट विळखा आणि लसीचे काऊंटडाऊन या पार्श्वभूमीवर सर्वांनीच आगामी काही महिने अधिक जबाबदारीने व सतर्क राहणे, नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे वाटते आहे, त्याच जोडीला आरोग्यसेवा व अन्य व्यवस्थाचे सक्षमीकरण गरजेचे आहे. कोव्हिडवरची ही लस सर्वप्रथम कोरोनायोद्धे अर्थात डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी पोलीस, प्रशासकीय अधिकारी, सैन्यदल व अत्यंत गरजूंना देणार असे भारत सरकारने धोरणात्मक ठरवले आहे. लस पुण्यात तयार होणार आणि सिरम करणार म्हणजे हिंदुस्थानात आणि महाराष्ट्रात काही अडचण येऊ नये. पण काही अपप्रवृत्ती टाळूवरचे लोणी खाण्यासाठी टपलेल्या असतात. कोरोना युद्धात ही प्रवृत्ती आजही हपापलेली दिसते आहे. या लसीच्या निमित्ताने दिसू शकेल. सरकारने या प्रवृत्तींवर नजर ठेवली पाहिजे आणि या समाजकंटकांचा पक्का बंदोबस्त केला पाहिजे. 73 दिवसांनी लस येणार, मोफत सर्वांना मिळणार आणि कोरोना युद्ध माणूस जिंकणार हे निश्चित झाले आहे. या वार्तेचे स्वागत केले पाहिजे. कोरोनावर विजय याची देही याची डोळा पाहण्यासाठी आगामी काळ संयम,नियम व काळजीपूर्वक सांभाळला पाहिजे.
Previous Articleयंदा हे नाहीच!
Next Article सांगली जिल्हय़ात 272 मुक्त तर नवे 131 रूग्ण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








