कणकवली, कासार्डे, देवगडची निवड : उणिवा न राहण्यासाठी सज्जता
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी सुरू आहे. लसीकरणात कोणत्याही उणिवा राहू नयेत, यासाठी कणकवली, कासार्डे आणि देवगड या तीन ठिकाणी शुक्रवारी कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) घेतली जाणार आहे. यावेळी लसीकरणाच्या सर्व साधनसामुग्री उपलब्धतेची खात्री पटवून घेतली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा बैठकीत दिली. तसेच कोरोना लसीकरणासाठी प्रशासकीय यंत्रणेने सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हय़ातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी विशेष लक्ष पुरवावे, तसेच रिकव्हरी रेट वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने काम करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱयांनी दिल्या. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वंदना खरमाळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत व अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हय़ातील मृत्यूदर हा राज्याच्या मृत्यू दरापेक्षा कमी असला तरी तो अजूनही कसा कमी करता येईल, या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाल्या की, सावंतवाडी तालुक्मयात इतर तालुक्यांपेक्षा मृत्यूदर अधिक आहे. त्याची कारणे शोधून अभ्यास करावा. सावंतवाडीतील मृत्यूदर कमी करण्यासाठी तालुकास्तरावरील अधिकारी व यंत्रणांनी नियोजन करून काम करावे, जिल्हय़ाचा रिकव्हरी रेटही वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणांनी काम करावे. तसेच ज्या रुग्णांना घरी सोडले जाते, त्यांचा डाटा दररोज अपडेट करावा. कोविड केअर सेंटरवर किमान कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा.
पर्यटकांची माहिती ठेवावी!
नव्या कोरोना स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे. जिल्हय़ात परदेशातून येणाऱया सर्व नागरिकांची माहिती, त्यामध्ये स्थानिक व पर्यटक अशा दोन्ही प्रकारच्या लोकांची माहिती संबंधित यंत्रणांनी गोळा करावी. त्यासाठी योग्य तो समन्वय ठेवावा. उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावर पोस्ट कोविड ओपीडी सुरू करावी. गर्दीच्या ठिकाणांवरील व्यापारी तसेच रिक्षाचालक, बसचालक, हॉटेल मधील कर्मचारी यांची कोविडची चाचणी करण्यासाठी संबंधितांच्या संघटनांशी चर्चा करून तसे नियोजन करावे, अशा सूचनाही दिल्या.
यावेळी लसीकरणाच्या नियोजनाचाही आढावा जिल्हाधिकाऱयांनी घेतला.
शुक्रवारी आठ जानेवारीला जिल्हय़ात लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) घेण्यात येणार आहे. त्या विषयीची सविस्तर माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱयांनी दिली. कणकवली, कासार्डे आणि देवगड या तीन ठिकाणी ड्राय रन घेण्यात येणार आहे. यावेळी माकडतापाचाही आढावा घेण्यात आला. प्रत्येक ग्रामपंचायतींनी मेलेल्या माकडाची विल्हेवाट लावण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करण्याच्या सूचनाही यावेळी जिल्हाधिकाऱयांनी दिल्या.