लसीकरणावर विशेष भर- कंपनीचे समाजकार्यात विशेष योगदान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रो कोरोना संकटाशी लढण्यासाठी जवळपास 1000 कोटी रुपये मदत रुपात देणार आहे. हा पैसा लसीकरण अभियानासाठी कंपनी देणार आहे. या अगोदरही विप्रोने कोविड विरुद्धच्या लढाईसाठी 1125 कोटी रुपयांची मदत दिली आहे.
विप्रो कंपनीने मागील वर्षभरात मदतीची घोषणा केली होती आणि कोरोना काळात आपले पुण्यातील कार्यालय हॉस्पिटलमध्ये बदलले होते. विप्रोचे संस्थापक अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी म्हटले आहे, की अतिरिक्त अनुदान हे मुख्य स्वरुपात देशातील लसीकरण अभियानासाठी देण्यात येणार आहे.
लसीकरणावर भर आवश्यक- प्रेमजी
बॉम्बे चार्टर्ड अकाउंट सोसायटीच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमप्रसंगी बोलताना अझीम प्रेमजी यांनी म्हटले आहे, की ‘आमचे काम जसजसे पुढे जात आहे तस तसे सार्वजनिक पातळीवर लसीकरणावर जोर देण्याची आवश्यकता आहे.’
समाजकार्यात अग्रेसर
विप्रो समूहाने कोविडसोबत लढा देण्यासाठी मोठी मदत दिली आहे. यामध्ये अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या 1,600 कर्मचाऱयांनी, 55,000 सहयोगी संस्था यासोबत कर्मचारी आणि अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या 10,000 टीचर्स ऍण्ड 250 ऍल्युमनीच्या समावेशासह अभियान सुरु केले आहे. या कामगिरीवरुन विप्रोची समाजकार्यातील झेप आपल्या लक्षात येते.









