बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णांना उपचाराचा लाभ मिळावा यासाठी केंद्राने आयुष्मान भारत योजनेतील निकष शिथिल केले पाहिजेत, असे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी बुधवारी सांगितले. दरम्यान कुमारस्वामी यांनी तशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नाही. दरम्यान, कोरोना पीडितांना खासगी रुग्णालयात मोफत उपचार घेण्यास योजने अंतर्गत अनेक अडचणी येत आहेत. गंभीर रोगांवर बीपीएल कार्ड असणारे रुग्ण पाच लाख रुपयांपर्यंत विनामूल्य उपचार घेऊ शकतात, परंतु एपीएल कार्ड धारक कुटुंबांना या योजनेंतर्गत ५ लाखांपर्यंतच्या वैद्यकीय खर्चामध्ये ३० टक्के सवलत मिळेल, असे ते म्हणाले.
“आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना कोविड -१९ वर मोफत उपचार दिले गेले नाहीत तर या योजनेचा काय उपयोग?” असे कुमारस्वामी म्हणाले. कोरोना रूग्णांना मदत करण्यासाठी या योजनेंतर्गत निकष शिथिल करावे अशी मागणी केंद्र सरकारकडे कुमारस्वामी यांनी केली आहे.