रविवारी 230 रुग्ण झाले बरे : गोमेकॉतही पोहोचला कोरोना : 7 वॉर्डमधील 15 जण बाधित
प्रतिनिधी / पणजी
रविवारी 175 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले असून 230 जण बरे झाले आहेत. एकूण सक्रिय कोरोनाबाधित 1549 असून आतापर्यंतचे मिळून एकूण संख्या 4861 झाली आहे. 3277 जण त्यातून बचावले आहेत. एकूण मृतांची संख्या 36 वर पोहोचली आहे. कोरोनाची चाचणी दिलेल्या सुमारे 6633 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत.
आरोग्य खात्याने दिलेल्या आकडेवाडीनुसार रविवारी दोन विदेशी तर 7 देशी प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून 41 जणांना फॅसिलिटी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोनाचे संशयित म्हणून 32 जणांना गेमेकॉत आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले आहे. रविवारी 1359 जणांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले तर 1586 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात 175 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. विविध हॉटेल्स, रेसिडेंसीमध्ये मिळून 194 जणांना क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे.
विविध मार्गाने गोव्यात आलेल्या एकूण 94 प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीतून उघड झाले आहे. राज्यातील विविध आरोग्य केंद्रात नोंद झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे आहे. सांखळी – 73, म्हापसा 39, पणजी 46, कांदोळी 22, कोलवाळ 46, चिंबल 42, मडगाव 103, वास्को 339, कुठ्ठाळी 383, लोटली 27, धारबांदोडा 46, फोंडा 71, नावेली 23.
दांडो-करंजाळे येथे 2 तर भाटले पणजी येथे 1 मिळून राजधानीत 3 कोरोनाबधित सापडले आहेत. त्यात एका डॉक्टरचा समावेश असल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली आहे.
गोमेकॉतही पोहोचला कोरोना
कोरोनाची लागण आता गोमेकॉत देखील झाली असून एकूण 7 वॉर्डात त्याचे रुग्ण सापडले आहेत. म्हणजेच तेथे पूर्वीच उपचार घेणाऱया सुमारे 15 रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता गोव्याचे हे प्रमुख हॉस्पिटलच कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे.
7 वॉर्डमधील 15 जण बाधित
तेथील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व प्रकारचे शिष्टाचार पाळूनसुद्धा कोरोनाने 7 वॉर्डात शिरकाव केला आहे. त्यामुळे कोरोनाचे हे संक्रमण इतर वॉर्डात व संपूर्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे तेथील वैद्यकीय यंत्रणा, रुग्ण व त्यांचे नातेवाईक हादरले असून या संकटाचा सामना करण्याचे मोठे आव्हान आरोग्य खात्यासमोर उभे ठाकले आहे.
कोरोनाचे अनेक संशयित रुग्ण गोमेकॉतही तपासणीसाठी येतात. अनेकांना तेथील विलगीकरण वॉर्डमध्ये भरती करण्यात येते. कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर त्यांची रवानगी मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये करण्यात येते. चाचणीसाठी येणारे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह-निगेटिव्ह असतात की नसतात हे आधी कळत नाही. चाचणीचा निकाल आल्यानंतरच ते कळते, तोपर्यंत अनेक पाझिटिव्ह रुग्ण अनेकांच्या संपर्कात आलेले असतात. त्यात आरोग्य खात्याचे तसेच हॉस्पिटलचे कर्मचारी, नर्स, डॉक्टर्स यांचाही समावेश असतो. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण एसओपीचे पालन तेथे करण्यात येते. तरीही कोरोनाने 7 वॉर्डातून डोके वर काढले असून ते सातही वॉर्ड सेनिटाईझ करून पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.
कोरोनाचा रविवारी आणखी एक बळी : बळीची संख्या पोचली 36 वर
प्रतिनिधी / मडगाव
कोरोनाने सद्या सर्वाधिक जास्त फटका हा मुरगांव तालुक्याला दिला आहे. काल रवारी पुन्हा नवेवाडे-वास्को येथील आणखी एका 63 वर्षीय कोविड रूग्णाचा येथील कोविड हॉस्पिटलात बळी गेला. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे बळी गेलेल्याची संख्या 36 वर पोचली आहे.
रविवारी बळी गेलेल्या व्यक्तीवर कोविड हॉस्पिटलाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. सकाळी 9.40 च्या दरम्यान त्याचा बळी गेला. या व्यक्तीला उच्च रक्तदाब, न्यूमोनियासारखे अन्य आजार होते. त्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्याची प्रकृती नाजूक बनली होती.
शनिवार हा ‘घातवार’ ठरला. शनिवारी एकाच दिवशी सहा कोरोना बळीची नोंद झाली. सहा पैकी चार हे वास्कोतील होते. तर अन्य दोन विर्डी-साखळी व चोडण येथील होते. खारीवाडा-वास्को येथील एका 14 वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा बळी हा सर्वांसाठी धक्का देणारा तसेच चिंतेचा विषय बनून राहिला. आत्तापर्यंत राज्यात वयस्क व्यक्ती व ज्यांना जुने आजार होते, तेच कोरोनाचे शिकार बनले होत. मात्र, 14 वर्षांची विद्यार्थिनीचा कोरोनामुळे बळी गेल्याने, लोकांनी प्रचंड धास्ती घेतली आहे.
दरम्यान, काल कोविड हॉस्पिटलातून पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर जवळपास 24 रूग्ण नव्याने भरती झाले आहेत.









