मंगळवारी 29 नवीन रुग्णांची नोंद : वाढत्या रुग्णांमुळे वास्को, सत्तरीत खळबळ : सरकारी अधिकाऱयांची वास्को, शिरोडय़ात पाहणी
प्रतिनिधी / पणजी
राज्यात कोरोनाचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मांगोरहिल-वास्को व न्यु वाडे, बायणा, ओरुले भागात मिळून मंगळवारी आणखी 22 नवे रुग्ण सापडले. गोव्याबाहेरून आलेले आणखी 7 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये रेल्वेतून आलेल्या दोन रुग्णांचा सामावेश आहे. मंगळवारी सापडलेल्या नवीन रुग्णांमुळे आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 292 वर पोहोचली आहे. उसगाव भागात व सत्तरीमध्ये रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे.
जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी गोव्यातील रुग्णांची संख्या वाढल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्रातून रस्ता वाहतुकीद्वारे आलेले 4 लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत, तर कार्नाटकातून आलेला 1 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. आणखी 2 पॉझिटिव्ह ठरलेले रुग्ण हे रेल्वेतून गोव्यात आले होते. यापैकी एक औरंगाबाद येथून तर दुसरा दिल्लीहून गोव्यात आला आहे. या रुग्णांमध्ये आरोग्य कर्मचाऱयांचा सहभाग पुन्हा एकदा आढळून आला आहे. आरोग्य खात्यात काम करणाऱया कर्मचाऱयांना बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर काणकोण व सत्तरीसारख्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आले आहे.
मंगळवारी केलेल्या चाचण्यांपैकी 1089 चाचण्यांचे अहवाल अजून यायचे आहेत. मंगळवारी मांगोरहिल येथे जाऊन पाहणी करण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्यसचिव, जिल्हाधिकारी नीला मोहनन, पोलीस महानिरीक्षक तसेच उपजिल्हाधिकारी यांचीही उपस्थिती होती. प्रशासकीय अधिकाऱयांचीही यावेळी उपस्थिती होती. जिल्हा प्रशासनाने केलेली उपाययोजना तसेच पोलिसांनी कंटेनमेंट झोनसाठी केलेल्या तयारीची यावेळी पाहणी करण्यात आली. लोकांसाठी केलेल्या ओपीडी सेवा यांचीही पाहणी केली. यावेळी मांगोरहिल येथील लोकांशी चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक सूचना केल्या व अडचणीही सांगितल्या.
वास्को ओपीडी आता तीन तासांसाठी
अगोदर ओपीडी आरोग्य सेवा दोन तासासाठी होती. आता मुख्य सचिवांनी ही सेवा तीन तासांसाठी करण्याचे ठरविले आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ती खुली राहणार आहे. काही औषधे पुरविण्याची मागणीही पोलिसांनी केली. स्थानिकांशी याबाबत चर्चा करून आवश्यक औषधांची यादी स्थानिक प्रशासनाला देण्याची सूचना केली, असेही नीला मोहनन यांनी सांगितले.
पर्यटनखात्याशी 30 व्यवसायिकांचे अर्ज ः डिसोझा
यावेळी उपस्थित असलेले पर्यटन खात्याचे संचालक मिनीनो डिसोझा यांनी हॉटेल व्यवसायाबाबत आलेल्या मार्गदर्शक तत्वांची माहिती दिली. केंद्र सरकारने हॉटेल व्यवसाय सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार हॉटेल व्यावसायिकांनी पर्यटन खात्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे. सध्या आपल्यापाशी 30 आर्ज आले आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी केली जाते की नाही हे अगोदर पाहिले जाणार असल्याचे डिसोझा यांनी सांगितले.
मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी होणे गरजेचे ः देसाइ&
हॉटेल व्यवसाय जरी सुरू झाला तरी पर्यटक कुठे आहेत हा मुद्दा आहे. कर्मचाऱयांचीही समस्या आहे. त्यामुळे त्यांच्याशी याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे, मात्र त्यासाठी केंद्राच्या सर्व मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे पर्यटन खात्याचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांनी सांगितले.
गोव्यात आलेल्या लोकांची व गोव्यातून बाहेर गेलेल्या लोकांची संख्या बरीच वाढली आहे. आजपर्यंत गोव्यात 21141 लोक आले आहेत, तर 1,10348 लोक गोव्यातून बाहेर गेले आहेत. आरोग्यसेतू ऍप आतापर्यंत 299000 लोकांनी डाऊनलोड केले आहे. गोवा सोडून जाण्यासाठी मजुरांची तयारी होईल तशा रेल्वे गाडय़ा जोडल्या जातील, असे माहिती खात्याच्या संचालक मेघना शेटगावकर यांनी सांगितले.
पणजी : पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्य सचिव नीला मोहनन. बाजूला मिनिनो डिसोझा, स्वप्नील देसाई व मेघना शेटगावकर.

उसगावात दोन कोरोना पॉझिटिव्ह : दोन दिवस उसगाव पूर्ण लॉकडाऊन : 43 जणांचे नमुने तपासणीसाठी
वार्ताहर / उसगाव
उसगाव-गांजे पंचायत क्षेत्रात सोमवारी रात्री दोघे कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून हे दोघेही आरोग्य खात्याचे कर्मचारी आहेत. वास्को व मडगाव येथे डय़ुटीवर असताना त्यांना संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पुढील दोन दिवस म्हणजे 10 व 11 जून रोजी तिस्क उसगाव येथील मुख्य बाजारपेठेसह संपूर्ण उसगाव पंचायत क्षेत्रात बंद पाळण्यात येणार आहे.
मंगळवारी सायंकाळी झालेल्या पंचायत मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. उसगाव भागातील ज्या वाडय़ावर हे दोघेही रुग्ण राहतात, त्यांच्या कुटुंब सदस्यांसह संपर्कात आलेल्या 42 लोकांचे नमूने कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती पिळये आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. संदेश मडकईकर यांनी दिली आहे. या सर्वांचे अहवाल आज बुधवारी उपलब्ध होणार आहेत. आवश्यकता भासल्यास अजून काही लोकांच्या चाचण्या घेण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उसगावात दोन दिवस बंद पाळण्याचा निर्णय
उसगाव पंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीला सरपंच संगीता गावकर, उपसरपंच रामनाथ डांगी, पंचसदस्य तुळशीदास प्रभू, दिनेश तारी, सीमा मास्कारेन्हास, विलियम मास्कारेन्हास, मनिषा उसगावकर, रेखा वेलिंगकर व अस्मिता गावडे हे उपस्थित होते. आरोग्याधिकारी डॉ. संदेश मडकईकर, फोंडय़ाचे पोलीस उपनिरीक्षक अजित उमर्ये यांनीही बैठकीला उपस्थित राहून काही सूचना केल्या. उसगावात कोरोना रुग्ण सापडल्याने नागरिकांनी भयभित न होता, खबरदारी घेणे गरजेचे आहे. फेसमास्क, सेनिटायझर्सचा वापर करतानाच सामाजिक अंतर राखावे तसेच पुढील दोन दिवसांच्या उसगाव बंदला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन पंचायतीने केले आहे.
खासगी बसेसही बंद राहणार
प्रवासी, बसचालक व वाहकांच्या सुरक्षेसाठी तिस्क उसगावमार्गे वाहतूक करणाऱया खासगी बसेस पुढील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय येथील खासगी बसमालक संघटनेने घेतला आहे. त्यामुळे तिस्क-उसगाव मार्गावरुन फोंडा-डिचोली, फोंडा-वाळपई, फोंडा-साकोर्डा, धारबांदोडा तसेच दाभाळ मार्गावरील बसेस बंद राहणार आहेत.
फोंडा तालुक्यात चार पॉझिटिव्ह
उसगाव येथे दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने फोंडा तालुक्यात आत्तापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या चार झाली आहे. यापूर्वी आडपई व कुंकळय़े म्हार्दोळ येथे सापडलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे नमुनेही नकारात्मक आले आहेत. धारबांदोडा भागात अन्य एक व्यक्ती संशयास्पद आढळून आल्याने त्याची चाचणी होणार असल्याची माहिती डॉ. मडकईकर यांनी दिली आहे.
उसगाव : बैठकीत बोलताना सरपंच संगीता गावकर. बाजूला डॉ. संदेश मडकईकर, उपनिरीक्षक अजित उमर्ये व इतर पंचसदस्य.
काणकोणात आढळला पहिला रुग्ण : कदंबचा चालक, 21 कुटुंबियांची चाचणी
प्रतिनिधी / काणकोण

कोविड-19 चा फैलाव मांगोरहिल, वास्को येथे वाढून इतरही काही भागांमध्ये रुग्ण सापडू लागल्यावर काणकोण तालुक्यातही भीतीचे वातावरण पसरले होते. तालुक्यात आता पहिला कोरोना रुग्ण सापडल्याने यात भर पडली असून कडक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मंगळवारी चाचणी पॉझिटिव्ह आलेला सदर इसम हा कदंबचालक असून त्याला शिरोडा येथील कोविड केंद्रात पाठविण्यात आले आहे. त्याच्या कुटुंबातील 21 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली आहे.
यापूर्वी चावडीवरील कदंब बसस्थानकाच्या छप्पराचे जुने साहित्य गोळा करायला आलेला एक कामगार मागच्या दहा दिवसांपासून कोविड इस्पितळात उपचार घेत आहे. रवींद्र भवनाच्या कामाला आलेल्या एका कामगाराच्या नातेवाईकाची 8 रोजी जी चाचणी करण्यात आली होती त्याचा अहवाल अजून आलेला नाही, अशी माहिती काणकोणचे मामलेदार विमोद दलाल यांनी दिली.
पोळे चेकनाक्यावर थर्मल स्कॅनरची सोय
सरकारच्या नव्या धोरणानुसार पोळे चेकनाक्यावर थर्मल स्कॅनर बसविण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे गोव्यातून परराज्यात जाणाऱया किंवा परराज्यांतून येणाऱया नागरिकांची चाचणी घेता येण्याबरोबरच इतर माहिती उपलब्ध होणार असल्याचे मामलेदार दलाल यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर कुटुंबियांपैकी एक इसम काणकोणच्या शासकीय संकुलातील एका कार्यालयात काम करत असून दुसरी व्यक्ती गोवा डेअरीला दूधपुरवठा करते. त्यामुळे शासकीय संकुलाच्या ठिकाणीही आवश्यक उपाययोजना राबविण्याची मागणी होऊ लागली आहे.
आजपासून स्वेच्छा लॉकडाऊनची तयारी
अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा विशेष गंभीर दिसत नसल्यामुळे आता काणकोणच्या जागरूक नागरिकांनीच पुढाकार घेण्याचे ठरविले असून आज बुधवार सायंकाळपासून पालिका क्षेत्रात स्वेच्छा लॉकडाऊन पाळण्याची तयारी चालली आहे. तालुक्यातील हॉटेल्स, खानावळी खुल्या झाल्यानंतर नागरिकांचा त्या ठिकाणी मुक्त संचार चालू झाला आहे. अशावेळी कोरोनाची लागण झालेली व्यक्ती जर बाजारात, सरकारी कार्यालयांत मुक्तपणे फिरायला लागली, तर काणकोण तालुक्याची बिकट अवस्था होणार आहे. यावर उपाय म्हणून काणकोणचा बाजार काही काळापुरता पूर्ण बंद ठेवण्याची तयारी आता जागरूक स्थानिकांनी चालविली आहे. यापूर्वी काणकोणात भंगार गोळा करणाऱया एका व्यक्तीविषयीही चर्चा चालू झाली होती. त्याचे पुढे काय झाले या गोष्टी गुलदस्त्यात आहेत.









