बरे होणाऱयांचे प्रमाणही वाढले : महाराष्ट्रात स्थिती चिंताजनक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाबाधितांची संख्या आता देशभरात 1 लाखांवर पोहचली आहे. मंगळवारी संध्याकाळी केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ती 1 लाख 1 हजार 232 होती. सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळ या चोवीस तासांमध्ये 4 हजार 970 नव्या रुग्णांची भर पडली असून त्यापैकी 2 हजार 124 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. याच कालावधीत 2 हजार 437 रुग्ण बरेही झाले असून हे प्रमाण बाधितांच्या संख्येच्या 38.78 टक्के इतके आहे.
याच कालावधीत देशात एकंदर 134 लोकांनी या रोगामुळे प्राण गमावले आहेत. त्यात महाराष्ट्राच्या 57 जणांचा समावेश आहे. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, केरळ, आसाम व ईशान्य भारतातील इतर सहा राज्यांचा रुग्णसंख्या आलेख आता सपाट होऊ लागला आहे. मात्र, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, पंजाब, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने ते चिंतेचे कारण बनले आहे.
अनेक राज्यांमध्ये व्यवहार सुरू
मोठय़ा प्रमाणात कोरोनाग्रस्त असणाऱया राज्यांमध्येही आता आर्थिक व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. निर्बंध बऱयाच प्रमाणात हटविण्यात आले असून दुकाने व इतर सेवाकेंद्रे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या काळात सुरू करण्यात आली आहेत. दिल्ली, कर्नाटक, केरळ व इतर काही राज्यांमध्ये बससेवा काही अटींसह सुरू करण्यात आल्याने लोकांच्या हालचालींना वेग आला आहे.
केंद्रीय कर्मचाऱयांना आदेश
केंद्रीय कर्मचाऱयांनी आता कार्यालयांमध्ये 50 टक्के इतक्या संख्येने उपस्थित रहावे, असा आदेश केंद्र सरकारने काढला आहे. त्यामुळे मंगळवारपासून दिल्लीतील विविध केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये वर्दळ दिसून आली. तसेच लोकांची प्रलंबित कामेही काहीशा जास्त वेगाने निपटली जात असल्याचे दिसून आले.









