आरोग्य सचिव निला मोहनन यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात काल शुक्रवारी 100 नवीन कोरोना रुग्ण सापडले असून 74 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 895 सक्रीय कोरोनाबाधित आहेत. आतापर्यंतचे एकूण रुग्ण 2251 झाले आहेत तर आतापर्यंत 1374 जण बरे झाले आहेत. कोरोना बळींची संख्या 9 वर स्थिरावली आहे. 24 जणांना संशयित रुग्ण म्हणून हॉस्पिटलात आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले आहेत.
आरोग्य खात्यातर्फे ही माहिती जारी करण्यात आली असून आरोग्य सचिव निला मोहनन यांनी पत्रकार परिषदेत त्याबाबत अधिक तपशील दिला.
डॉक्टर्स, नर्स, कर्मचाऱयांचे शर्थीचे प्रयत्न
कोरोना रुग्णांना पुरेशी औषधे तसेच योग्य ते खाणे-पिणे देण्यात येत असून त्यात कोणतीही कुचराई होत नाही. मडगावच्या कोविड हॉस्पिटलाची क्षमता 120 बेड असून तेथे आमदार क्लाफासियो डायस यांच्यासह सर्व कोरोना रुग्णांवर योग्य ते उपचार चालू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असून ते बरे व्हावेत म्हणून डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी प्रयत्नांची शर्थ करीत आहेत, असे त्या म्हणाल्या.
कोलवाळ जेलमधील अहवाल निगेटिव्ह
कोलवाळमध्ये जेलगार्ड कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर तेथील त्यांच्या संपर्कातील सुमारे 42 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पर्वरी येथील शिक्षण खाते मुख्यालयात एका विभागातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर तो विभाग सील व सॅनिटाईझ करण्यात आला असून तेथील सुमारे 22 जणांचे नमुने कोरोना तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती मोहनन यांनी दिली.
दोन दिवसांत गोळा केले 4500 नमुने
मागील दोन दिवसात मिळून एकूण 4500 जणांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 1715 जणांचे अहवाल निगेटिव्ह मिळाले असून 100 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 2685 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. ऍन्टी बॉडी टेस्टींग तसेच प्लाझ्मा थेरपी पुढील आठवडय़ात सुरू होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
कोरोनासंदर्भात जनजागृतीसाठी जाहिराती
अधिक जनजागृती व्हावी म्हणून सरकारने कोरोनासंदर्भात जाहिरातबाजी सुरू केली असून खोकला, ताप, श्वास घेण्यास अडचणी अशी लक्षणे असतील तर त्वरित जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात किंवा सरकारी इस्पितळात जाऊन तपासणी करावी, तसेच 104 या फोनवर कळवावे, असे आवाहन मोहनन यांनी केले आहे. लोकांनी वरील लक्षणे अंगावर काढू नयेत, असेही त्यांनी सूचित केले आहे.
बेतकी-खांडोळा येथे 35 कोरोना रुग्ण सापडले असून सडा-88, बायणा-91, कुडतरी-32, न्युवाडे-78, चिंबल-60, झुआरीनगर-118, खारीवाडा-52, मोर्ले-22, बाळ्ळी-27, मोतीडोंगर-13 या ठिकाणी मोठय़ा संख्येने कोरोनाबाधित मिळाले आहेत.
कोरोना रूग्णांसाठी सरकार औषधे उपलब्ध करणार : राणे

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकार रेमडेसिविर आणि टॉसीलीझुम्बी ही औषधे उपलब्ध करण्यात येणार आहे. ही औषधे कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.
रेमडेसिविर औषधाची 30 वायल्स सरकारने आणली आहेत. हे औषध एम्सच्या प्रोटोकॉलनुसार रुग्णांना पाचव्या व आठव्या दिवशी दिले जाते. या औषधाच्या आणखी 1000 वायल्स मागविण्यात आल्या आहेत. या औषधाचा पुरवठा सध्या कमी आहे. रेमडेसिविर एक वायल्सची किंमत 3500 रुपये एवढी आहे. एक वायल 6 रुग्णांसाठी वापरता येते. या औषधाची कालमर्यादा 3 महिन्यापर्यंत असते.
टॉसीलीझुम्बी औषधाचे 100 डोस आणण्याची तयारी सरकारने केली आहे. एक डोसची किंमत 40 हजार रुपये एवढी आहे. कोरोना बाधित रुग्णासाठी हे डोस उपयुक्त ठरणार आहेत. जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत त्यानी आपला प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन त्यांनी केले. आमदार क्लाफास डायस यांची प्रकृती स्थीर आहे असेही राणे यांनी सांगितले.









