मात्र 22 जिल्हय़ांमध्ये रुग्णसंख्येत वाढ, केरळ विशेष चिंतेचा विषय
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मंगळवारी देशात गेल्या 132 दिवसांमधील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. सोमवार ते मंगळवार या चोवीस तासांच्या कालावधीत कोरोनाचे 29,689 नवे रुग्ण आढळले. 124 दिवसांनंतर प्रथमच उपचाराधीत रुग्णांची संख्या चार लाखापेक्षा कमी झाली आहे. तरीही कोरोना संपलेला आहे, या भ्रमात राहू नका अशा इशारा केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
तिसऱया उद्रेकाची शक्यता मावळलेली नाही. देशाच्या 22 जिल्हय़ांमध्ये प्रतिदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चिंताही वाढलेली आहे. या 22 जिल्हय़ांमधील 7 केरळमधील आहेत. सध्या प्रतिदिन 10 हजारांवर नव्या रुग्णांची नोंद करणारे हे एकमेव राज्य आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवडय़ात सरासरी 5 हजार नवे रुग्ण प्रतिदिन नेंदविले गेले आहेत. इतरत्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून येते.
ईशान्य भारतात प्रमाण जास्त
ईशान्य भारतातील सात पैकी चार राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या राज्यांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा पॉझिटीव्हीटी दरही जास्त म्हणजे 10 टक्यांहून अधिक आहे. या राज्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जावे, अशी सूचना आरोग्य विभागाने या राज्यांना केली. देशात प्रतिदिन 100 हून अधिक नवे रुग्ण नोंदविणारे 62 जिल्हे असून तेथे प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले आहेत.
इतर संसर्गही चिंताजनक
कोरोनाच्या रुग्णांना या विषाणूबरोबरच पावसाळय़ाच्या दिवसांमध्ये इतर विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो. अशी स्थिती जास्त धोकादायक असू शकते. शरिरात एकाचवेळी दोन किंवा अधिक विषाणूंचा संसर्ग झालेल्या असल्यास अशा रुग्णांची विशेष काळजी घेतली जावी. त्यांच्यावर औषधोपचार करताना अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता आरोग्य विभागाने सूचित केली आहे.









