देशात 24 तासात आढळले 38 हजारहून अधिक नवे बाधित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाची दुसरी लाट थोडी कमजोर झाली असली तरी अजून संपलेली नाही. दररोज सुमारे 35 ते 40 हजार नवीन लोक कोरोनाने संक्रमित होत आहेत. बुधवारी आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडय़ांनुसार, मागील 24 तासात 38 हजार 792 नवीन कोरोना रुग्ण सापडले असून 624 संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. तर मागील 24 तासात 41 हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. नव्या बाधितांपेक्षा डिस्चार्ज मिळणाऱयांची संख्या अधिक असल्याने सक्रिय रुग्णसंख्येत घट झाली आहे. सध्या देशात एकंदर 4 लाख 29 हजार 946 इतके लोक उपचार घेत आहेत. सलग 17 दिवस 50 हजारपेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश यांच्या संयुक्त प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
देशात कोरोनाने आतापर्यंत एकूण 4 लाख 11 हजार 408 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 3 कोटी 1 लाख 4 हजार 720 जण उपचाराअंती बरे झाले आहेत. महामारीच्या सुरूवातीपासून आतापर्यंत एकंदर 3 कोटी 9 लाख 46 हजार 74 इतके लोक संक्रमित झाले आहेत. एकूण बाधितांपैकी 4 लाख 11 हजार 408 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.33 टक्के आहे तर रिकव्हरी रेट 97 टक्केपेक्षा जास्त आहे. देशात चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली असताना साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सातत्याने खाली येत आहे. सध्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 2.25 टक्के आहे. आज दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.10 टक्के आहे.
38 कोटीपेक्षा अधिक लसीकरण
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 13 जुलैपर्यंत देशभरात 38 कोटी 76 लाख कोरोना व्हॅक्सीनचे डोस दिले गेले आहेत. मंगळवारी दिवसभरात 37 लाख 14 हजार डोस देण्यात आले. 21 जून 2021 पासून कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा सुरु झाला आहे. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे. तसेच आतापर्यंत 43 कोटी 59 लाख 73 हजार 639 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यापैकी सुमारे 19.15 लाख कोरोना सॅम्पल मंगळवारी दिवसभरात तपासण्यात आले असून त्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्केपेक्षा कमी आहे.









