ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारत रशियाला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या 6 लाख 97 हजार 836 वर पोहचली असून, मृतांचा आकडा 19 हजार 700 एवढा आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
भारतात 6.97 लाख कोरोनाबाधितांपैकी 4 लाख 24 हजार 891 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अजूनही 2 लाख 53 हजार 545 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 8944 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
जगातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेत आहे. अमेरिकेत आतापर्यंत 29 लाख 82 हजार 928 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 32 हजार 569 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 16 लाख 04 हजार 585 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 64 हजार 900 जणांचा मृत्यू झाला आहे. भारत तिसऱ्या तर रशिया चौथ्या स्थानावर आहे. रशियात 6 लाख 81 हजार 251 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 10 हजार 161 जण दगावले आहेत.









