ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयातून राज्यात सध्या सहा जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. मुंबई, पुणे आणि सांगली येथे हे रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या सहा जणांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली. त्यामुळे त्यांना राज्यातील वेगवेगळय़ा विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. सध्या कस्तुरबा रुग्णालयात 1, नायडू रुग्णालयात 4 तर मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 1 जण दाखल आहे.
यापैकी एक प्रवाशी सांगलीचा असून, तो चीनमधून आला आहे. त्याला सर्दी, तापाची सौम्य लक्षणे आढळल्याने मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
18 जानेवारीपासून मुंबई विमानतळावर आतापर्यंत 8 हजार 878 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 21 जणांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यापैकी 18 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले असून, उर्वरित तिघांचे प्रयोगशाळा निकाल आज येण्याची शक्यता आहे. तर 86 जणांची फोनवरुन विचारपूस सुरू आहे.









