जिल्हय़ातील 798 कर्मचाऱयांचा प्रश्न – आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने उपोषण
प्रतिनिधी/ सातारा
कोरोना संसर्ग सुरु झाल्यावर शासनाकडे कोणतीही यंत्रणा नव्हती, कर्मचारी नव्हती. जसजशी कोरोनाची दाहकता वाढू लागल्यावर शासनाने कोरोना संपेपर्यंत अशा अटीवर सातारा जिल्हय़ात आरोग्य विभागात विविध कामांसाठी 798 कर्मचारी नियुक्त केले. मात्र, गत महिन्यात या कर्मचाऱयांना कोणतीही नोटीस वा पूर्वसूचना न देता कामावरुन कमी केल्याने आता कोरोना योध्दा कर्मचारी परिषदेकडून सोमवार दि. 13 रोजीपासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
कोरोना कर्मचारी योध्दा कर्मचारी परिषदेने याबाबत मुख्यमंत्र्यांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱयांना निवेदन देवून याबाबतची कल्पना दिली आहे. 2 ते 8 सप्टेंबर कालावधीत कोरोना योध्दा कर्मचाऱयांच्या आंदोलनाला जिल्हय़ातील अनेक संघटना व मान्यवरांनी पाठिंबा व्यक्त केला केला. मात्र, तरी देखील राज्य शासनाने या कर्मचाऱयांची दखल घेतलेली नाही.
ज्या कोरोना कर्मचाऱयांनी गेल्या दीड वर्षांपासून जीवावर उदार होवून अनेकांचे जीव वाचवले त्यांना बेकायदेशीरपणे कोणतीही नोटीस न देता कामावरुन कमी करुन शासनाने कायदा मोडला आहे. आता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वृषाली खरात आमरण उपोषण सुरु करत असून मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा निर्धार त्यांनी केला आहे. ज्या प्रमाणे आरटीपीसीआर लॅब बंद पडल्यावर आरोग्य विभागाने 40 कंत्राटी कर्मचाऱयांच्या सेवा पूर्ववत केल्या त्याच्या पध्दतीने सर्व कोरोना योध्दा कर्मचाऱयांना न्याय द्या, ही त्यांची मागणी आहे.
निवेदनावर कोरोना योध्दा कर्मचारी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद काटे, राज्याचे अध्यक्ष योगेश स्वामी, सातारा जिल्हाध्यक्ष सोहेल पठाण व उपोषणास बसणाऱया वनिता खरात यांच्या स्वाक्षऱया आहेत.








