डॉ. अंजली चिक्कोडी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याची दक्षता हॉस्पिटलमध्ये पार पाडताहेत जबाबदारी
मनीषा सुभेदार/ बेळगाव
नैसर्गिक आपत्ती असो, विषाणूचे आक्रमण असो, उन्हाचा तडाखा असो किंवा महागाईचे चटके असोत, ‘ती’ उभीच राहते. संसार करताना ‘त्याची’ साथ मिळाली तर तिचा संघर्ष सुसहय़ होतो. अन्यथा ती ठाम उभी रहात परिस्थितीशी दोन हात करते, तिच्यातील ऊर्जा, शक्ती, चेतना या उपजतच आहेत. याचमुळे देवी रुपाशी शक्तीरुपाशी तिची तुलना केली जाते.
यंदा तर कोरोनाने आणि अतिवृष्टीने तिची सत्त्वपरीक्षाच घेतली. तळ गाठलेले धान्याचे डबे आणि खडखडाट असलेली तिजोरी यांना सामोरे जात कोरोनाकाळापासून तिने आपले घर कसे सावरले हे फक्त तीच जाणते. घरामध्ये गृहिणींची, हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची, समाजामध्ये कार्यकर्त्यांची कोरोनाने परीक्षा घेतली. परंतु ती लढत राहिली. कोरोनाने सर्वांनाच हादरा दिला. त्यामुळे प्रत्येक स्त्रीचे श्रम आणि मोल अनमोल आहेत. तथापि अशाही काळात ज्यांनी सेवेचे महत्त्व जाणले, शुन्यातून ज्या उभ्या राहिल्या अशा काही प्रातिनिधीक ‘दुर्गांना’ आपण आजपासून भेटणार आहोत.
डॉ. अंजली चिक्कोडी
निसर्गाशी खेळ करून चालणार नाही आणि माणुसकी इतके महत्त्वाचे काहीही नाही, हा धडा कोविडने फक्त मलाच नव्हे तर संपूर्ण समाजाला दिला आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी आली तेव्हा प्रथम भीती वाटली. परंतु हीच तर वेळ होती, समाजाच्या मदतीला धावण्याची, समाजाचे ऋण फेडण्याची…. या भावना आहेत डॉ. अंजली चिक्कोडी यांच्या.
कोरोनाकाळात त्यांनी जवळजवळ 150 हून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. मात्र त्याची सुरुवात करताना मनामध्ये भीतीचे, चिंतेचे गडद सावट होते. हे त्या नाकारत नाहीत. कोरोना योद्धा म्हणून त्यांचे काम या काळात ठळकपणे सामोरे आले.
डॉ. अंजली या मुळच्या जालनाच्या, वडिलांच्या फिरत्या नोकरीमुळे त्यांचे शिक्षण अनेक ठिकाणी म्हणजे सांगली, मिरज अशा विविध गावात झाले. मिरजच्या सरकारी वैद्यकीय कॉलेजमधून त्यांनी एमबीबीएस पूर्ण करून पुढे जनरल फिजिशियनमध्ये एम. डी. ही पदवी घेतली. मिरज येथे डॉ. थॉमस सी., डॉ. सोरतूर व डॉ. पॉल ज्युएट यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा मला खूप फायदा झाला. या तिघांकडून मी खूप शिकले.
येथेच डॉ. रविंद्र चिक्कोडी हे पॅथालॉजीचे शिक्षण घेत होते. दोघांचाही परिचय झाला व विवाहबद्ध होऊन ते बेळगावला आहे. मे 1990 मध्ये वडगाव येथे डॉ. अहिरराव यांच्या क्लिनिकमध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर गेल्या 17 वर्षांपासून पटवर्धन लेआऊटमध्ये हे दोघेही आपली सेवा बजावत आहेत.
दक्षता हॉस्पिटलमध्ये स्थापनेपासून डॉ. अंजली चिक्कोडी सक्रिय आहेत. आज दक्षता कॉलेज रोडवरून खानापूर रोडला स्थलांतरित झाले. तत्पूर्वी वडगाव आणि कॉलेज रोड अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी धडपड केली. वैयक्तिक प्रॅक्टिस व दक्षता अशा दोन्ही आघाडय़ा त्या सांभाळतात. कोरोनाचा शिरकाव झाला, तो वाढू लागला तसा खासगी हॉस्पिटल्समध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांना दाखल करून घेण्याची सूचना आली. सरकारी आदेश असल्याने तो बंधनकारक होताच. आणि इथेच डॉ. अंजली यांची परीक्षा सुरू झाली.
डॉ. अंजली म्हणतात, मे-जूनमध्ये आम्ही नॉन कोविड रुग्णांवर उपचार केले. त्या काळात बरीचशी हॉस्पिटल्स बंद होती. पण माझे काम मी सुरू ठेवले. कारण अशा रुग्णांना कोठे जावे कळत नव्हते. ऑगस्टमध्ये कोविडची रुग्णसंख्या वाढली आणि सरकारने कोविड वॉर्ड सुरू करण्यास सांगितले. आता येथे कोरोनाबाधित रुग्ण येणार हे समजल्याने प्रथम या उपचाराबाबत वाचन व अभ्यास करून माहिती घेतली.
तथापि मनामध्ये प्रचंड भीती होतीच. संभ्रम सुरू होता. अशावेळी पती डॉ. रविंद्र यांनी, आपण सरकारी कोटय़ामध्ये शिक्षण घेतले आहे. आता हीच वेळ आहे समाजाचे ऋण फेडण्याची. तेव्हा माघार न घेता हिंमतीने उभी रहा, असे सांगितले. आणि मी उपचार सुरू केले. खरे तर अनुभवाने बाहेरच्या जगात कोविडच्या नियमांचे उल्लंघन करत फिरणाऱयांपेक्षा कोविड वॉर्डमध्ये मी सुरक्षित आहे, असे मला प्रकर्षाने जाणवले.
अन् लोकांच्या मनोवृत्तीचे दर्शन घडले
या एकूण काळातील अनुभव काय? असे विचारता त्या म्हणाल्या, लोकांच्या मनोवृत्तीचे दर्शन या काळात घडले. दोन नमुन्यांचे लोक पहायला मिळाले. काही जणांनी आपल्या रुग्णांची काळजी घेतली. त्यांची चौकशी सातत्याने केली. परंतु काही जणांनी रुग्ण दाखल केल्यानंतर पूर्णत: पाठ फिरविली. जेव्हा अशा रुग्णांचा खर्च वाढला तेव्हा मग सिव्हिलमध्ये त्यांना पाठवून दिले. माझा मुलगा आणि सून जे. जे. हॉस्पिटलमध्ये असून ते कोविड वॉर्डमध्येच काम करतात. त्यांच्यापासून मला प्रेरणा मिळाली. शिवाय माझे सर्व सहकारी, स्टाफ, साहाय्यक यांच्याशिवाय मी एकटी काही करू शकले नसते. याची प्रांजल कबुली त्या देतात.
सर्वांशी मिळून मिसळून राहिलो तरच माणुसकी जगणार
या सर्व अनुभवांनी दिलेले शहाणपण कोणते? असे विचारता ‘माणुसकी सर्वात महत्त्वाची आहे, पैशाने काहीही होत नाही’ गरीब रुग्ण लवकर बरे होत असताना श्रीमंतांकडे पैसे असूनही उपचाराला वेळ लागला. हे वास्तवही या काळात समोर आले. त्यामुळे आपण समस्या निर्माण केल्या तरी निवारण करणारा कोणी दुसरा (ईश्वर) आहेच. तेव्हा शक्मयतो सर्वांशी मिळून मिसळून राहिलो तरच माणुसकी जगणार आहे, असे त्या म्हणाल्या.
माणुसकी, नम्रता अन् मदत याचा विसर पडू देवू नये!
मी वडगावला प्रॅक्टीस सुरू केली. तेव्हापासून वडगावच्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला खूप पाठिंबा दिला. याबद्दल मी कृतज्ञ आहे. माणूस हा निसर्गापुढे नेहमीच लहान राहिला आहे. विज्ञान-तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी निसर्गापुढे माणूस नेहमीच लहान असणार आहे. हे लक्षात घेऊन माणुसकी, नम्रता आणि मदत याचा विसर आपण पडू देवू नये.









