ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू आहे. या लढाईत आता रशिया निर्मित लस ‘स्पुटनिक V’ देखील दाखल झाली आहे. भारतात लसीकरण मोहिमेला वेग मिळणार आहे कारण रशियातून भारतात आलेल्या ‘स्पुटनिक V’ चा पहिला डोस घेतला गेला आहे.

भारतात सर्वात पहिल्यांदा डॉ. रेड्डी लॅबोरेटीजच्या कस्टम फार्मा सर्व्हिसचे ग्लोबल हेड दीपक सप्रा यांनी ‘स्पुटनिक V’ ची पहिली लस टोचून घेतली आहे. दीपक सप्रा यांना हैदराबाद येथे पहिला डोस देण्यात आला आहे. दरम्यान, ‘स्पुटनिक V’ च्या पुर्वीपासून भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसी उपलब्ध असून मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे.
- भारतीय बाजारात लसीची किंमत 995 रुपये
त्यानंतर आता भारतात ‘स्पुटनिक V’ दाखल झाली आहे. कंपनीकडून भारतीय बाजारात लसीची किंमत 995 रुपये आकारण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीकडून हे देखील सांगण्यात आले आहे की, या लसीचे भारतात उत्पादन सुरू केले जाईल त्यावेळी किंमत आणखी कमी होईल. भारतातील बाजारात ही लस पुढील आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे.
या महिन्याच्या अंतिम आठवड्यात 30 लाख ‘स्पुटनिक V’ लस भारतात पोहोचणार आहेत. सद्य स्थितीत केवळ 1.5 लाख लसी भारतात उपलब्ध आहेत. या देशात उत्पादन सुरू करण्यासाठी सरकार कडून डॉ. रेड्डी लॅबोरेटीजसह आणखी 5 कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. यामध्ये हेटेरो बॉयोफॉर्मा, विरचोव बॉयोटैक, स्टेलिस बॉयोफॉर्मा, ग्लैंड बॉयोफॉर्मा आणि पैनाशिया बॉयोटैक यांचा समावेश आहे.









