नवी दिल्ली :
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱया मृत्यूंचा दर भारतात लक्षणीयरित्या घसरला आहे. तसेच बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही समाधानाची बाब असल्याचे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले. मात्र नव्या रुग्णांची संख्या मात्र अद्यापही जास्त असून सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळ या 24 तासांच्या कालावधीत 49 हजारहून अधिकची वाढ झाली. मात्र बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येतही याच कालावधीत 35,176 ने वाढ झाली. 30 हजारांहून अधिक रुग्ण बरे होण्याचा मंगळवार हा सलग पाचवा दिवस होता. बरे होण्याचे प्रमाण आता 64.24 टक्क्यांवर पोहचले आहे. जूनच्या मध्यावर हे प्रमाण अवघे 53 टक्के होते. आता साधारणतः दीड महिन्यात त्यात 11 टक्क्यांची वाढ झाली. तसेच जूनच्या मध्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱयांचे प्रमाण 3.33 टक्के होते. ते आता 2.25 टक्के इतके घसरले आहे.









