आटपाडी / प्रतिनिधी
कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडुन पैसे घेणाऱ्या आटपाडी ग्रामपंचायतच्या कारभारावर प्रांताधिकारी संतोष भोर यांनी ताशेरे ओढले. माणुसकी जतन करण्याची अनेक उदाहरणे लोकांसमोर येत असताना कोरोना मृतावरील अंत्यसंस्कारासाठी सुरू असणारी वसुली संतापजनक असल्याची भावना व्यक्त करत प्रात संतोष भोर यांनी हा उद्योग तातडीने थांबविण्याचे आदेश दिले.
आटपाडी तालुक्यात आत्तापर्यंत ६०५८ आरटीपीसीआर तर २५३८ अँन्टीजेन असे एकुण ८६९६ इतक्या कोरोना चाचण्या सोमवारअखेर घेण्यात आल्या आहेत. त्यातुन १२६५ एकुण कोरोनाबाधित स्पष्ट झाले असुन पैकी ७८७ इतके कोरोनामुक्त झाले आहेत. ४६५ रूग्णांवर उपचार सुरू असुन त्यातील १५० बाधित हे होमआयसोलेशन आहेत. मे महिन्यापासुन आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रूग्ण सापडण्यास सुरुवात झाली असुन आत्तापर्यंत २२ जणांचा मृत्यु झाला आहे.
कोरोनाचा आढावा घेतानाच ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियानाबद्दल प्रांताधिकारी संतोष भोर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. तहसीलदार सचिन लंगुटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साधना पवार, बीडीओ भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. याचवेळी कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या आटपाडी ग्रामपंचायतने नातेवाईकाकडुन १२हजार रूपयांची वसुली सुरू केली असल्याची बाब उजेडात आली. याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे तहसीलदारांनीही स्पष्ट केले.
कोरोना मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शासनाने १४व्या वित्त आयोगाच्या निधीच्या व्याजातुन खर्चाचे निर्देश दिले आहेत. परंतु बँक ऑफ इंडिया व्याज देत नाही. त्यामळे आम्ही नातेवाईकांकडून पीपीई कीट, डिझेल, जळण याचे पैसे घेत असल्याचे आटपाडीचे ग्रामसेवक दत्तात्रय गोसावी यांनी सांगितले. यावर तीव्र संताप व्यक्त करत कोणाही कोरोना मृताच्या नातेवाईकाकडुन अंत्यसंस्काराचे पैसे घेवु नयेत, असे निर्देश प्रांताधिकारी संतोष भोर यांनी दिले. त्याचवेळी कठीण कालावधीत शासन, प्रशासन कोरोनाशी लढत असताना मृतावरील अत्यसंस्कारासाठी पैसे घेण्याचा उद्योग माणुसकी बाजुला ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकीसह अनेक कामे उधारीवर होतात. कोरोना केअर सेंटरसह अनेक ठिकाणी आर्थिक अडचणी आहेत. तरीही लोकाची समस्या सोडविण्याला प्रशासन प्रयत्न करत आहे. परंतु आटपाडी ग्रामपंचायत शासनाचे निर्देश डावलुन मृताच्या नातेवाईकाकडुनच वसुली करते हा उद्योगच चुकीचा असल्याचे सांगत बीडीओ भोसले यांनी याबाबत लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा, असे निर्देशही प्रांतांनी दिले. याप्रश्नी ग्रामसेवकांना खडे बोल सुनावत माणुसकीचीही आठवण करून देण्यात आली.
आटपाडी ग्रामपंचायतमधील सत्ताधारी पक्षांच्या खालच्या पातळीवरील राजकारण आणि खर्चाच्या अडचणी यामुळे कोरोना मृतावरही पैसे घेवुन अंत्यसंस्काराचा प्रकार चर्चेत आला. ग्रामसेवकांनी विद्युत दाहिनीची मागणी केली. तर आम्हीच जळणाची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, अशी उद्विग्न भावनाही प्रांताधिकारी संतोष भोर यांनी व्यक्त केली आणि यानिमित्ताने आटपाडी ग्रामपंचायतच्या ‘माणुसकी शुन्य’ कारभाराचाही पंचनामा झाला.








