काँग्रेस खासदार खर्गे यांची पत्राद्वारे मोदींना सूचना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना महामारीला हाताळण्यासाठी सामूहिक स्वरुपात एक समग्र ब्ल्यूप्रिंट तयार करण्याच्या उद्देशाने तत्काळ सर्वपक्षीय बैठक आयोजित करा असे आवाहन काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी सरकारला केले आहे. केंद्र सरकार लोकांबद्दलच्या स्वतःच्या उत्तरदायित्वापासून पळत असल्याचे जाणवत आहे. सद्यस्थितीत एक समग्र तसेच सर्वसंमत प्रयत्न केले जाण्याची आवश्यकता असल्याचे खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
खर्गे यांनी महामारीच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी 6 सूचनाही केल्या आहेत. पंतप्रधान कार्यालय एकटय़ाने या महामारीला तोंड देऊ शकत नाही. महामारीला सामोरे जाण्यासाठी सामूहिक स्वरुपात एक समग्र ब्ल्यूप्रिंट तयार करण्याच्या उद्देशाने सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्याचे आवाहन करतो. आमच्यासाठी ही योग्यप्रकारे काम करणे आणि तज्ञ तसेच कार्यकर्त्यांच्या सूचनांवर अंमलबजावणी करण्याची एक चांगली संधी ठरू शकते असे खर्गे यांनी नमूद पेले आहे.
देशासमोरील अभूतपूर्व संकटामुळे निर्माळा झालेल्या नाराजीची कल्पना देण्यासाठी हे पत्र लिहित आहे. संसदेने सर्वांसाठी मोफत लसीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. तरीही केंद्र सरकारने लसींसाठी खूपच अधिक आणि वेगवेगळी किंमत निश्चित करण्याची अनुमती खासगी कंपन्यांना दिली. तसेच लसींच्या खरेदीची जबाबदारी राज्य सरकारांवर ढकलल्याचे खर्गे यांनी पत्रात म्हटले आहे.
कॉर्पेरेट कंपन्यांना होणारा नफा लोकांचे जीवन वाचवू शकणार नाही. याचमुळे नागरिकांच्या लसीकरणातील नैतिक जबाबदारी टाळू नका अशी विनंती करतो. यशस्वी आणि व्यापक लसीकरण कार्यक्रमांचा भारताचा इतिहास राहिला असल्याने ही मोहीम यशस्वी ठरण्याची पूर्ण शक्यता असल्याचे खर्गे यांनी केंद्र सरकारला उद्देशून म्हटले आहे.
लाखो सर्वसामान्य भारतीयांना मूलभूत आरोग्य देखरेख, ऑक्सिजन, औषधे, व्हेंटिलेटर, रुग्णालयातील बेड्स आणि शवागार तसेच दफनभूमीपर्यंत पोहोचण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिक स्वतःच्या कुटुंबीयांवर उपचार सुनिश्चित करण्यासाठी स्वतःची जमीन आणि दागिने विकत आहेत. अंत्यसंस्कारांसाठी आता उद्यानांचा वापर करण्याची स्थिती ओढवली असल्याचे ते म्हणाले.
विविध राज्य सरकारे, विरोधी पक्ष, डॉक्टर-नर्स तसेच अन्य आरोग्य विषयक संघटना, नागरी संघटना तसेच नागरी गटांनी कोरोनाविरोधी लढय़ात भाग घेतला आहे. केंद्र सरकारने आमच्या सामूहिक शक्तीचा लाभ घ्यावा, कारण केवळ पंतप्रधान कार्यालय या संकटाला हाताळू शकत नसल्याचे खर्गे यांनी म्हटले आहे.









