प्रत्येक सहाव्या नागरिकासमोर भूकेची समस्या : 2008 च्या आर्थिक मंदीपेक्षाही वाईट स्थिती : स्वयंसेवी संस्था सरसावल्या
कोरोना महामारीमुळे अनेक देश आणि त्यांच्या नागरिकांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. गरीब देशांसह विकसित देशांमध्येही याचा फटका दिसून येत आहे. अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या दृष्टीकोनातून जगातील सर्वात समृद्ध देश अमेरिकाही यापासून अस्पृश्य राहिलेला नाही. महामारीमुळे तेथे मोठय़ा प्रमाणावर लोकांनी रोजगार गमाविला असून यातूनच अमेरिकेत भूकेची समस्या उभी ठाकली आहे.
प्रत्येक चौथे अमेरिकन मूल उपाशी
अमेरिकेतील सर्वात मोठी मदत संस्था फीडिंग अमेरिकेच्या अहवालानुसार तेथे डिसेंबरच्या अखेरीस 5 कोटींपेक्षा अधिक लोक अन्न असुरक्षेला तोंड देत होते. म्हणजेच प्रत्येक सहावा अमेरिकन नागरिक भूकेच्या संकटाला सामोरा जात होता. मुलांच्या प्रकरणी स्थिती अधिकच वाईट आहे. प्रत्येक चौथे अमेरिकन मूल उपाशी राहण्यास हतबल आहे.
गरजूंची संख्या वाढतेय
जूनपासूनच अमेरिकेत अन्नाच्या गरजूंची संख्या अत्यंत वेगाने वाढत असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. संपूर्ण देशात अशा गरजूंची संख्या महामारीच्या पूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. तर मुले असलेल्या अशा गरजू कुटुंबांची संख्या तीनपट वाढली आहे.
महिन्यात 54.8 कोटी खाद्यपाकिटांचे वाटप
फीडिंग अमेरिका नेटवर्कने एक महिन्यात 54.8 कोटी खाद्यपाकिटांचे वितरण केले आहे. महामारी सुरू होण्यापूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण 52 टक्क्यांनी अधिक आहे. खाद्यसामग्रीचे वाटप होत असलेल्या ठिकाणी मोठय़ा रांगा लागत आहेत. संस्था शहरात नाताळापूर्वी दरवर्षी सरासरी 500 लोकांना अन्न पुरवत होती. परंतु आता हा आकडा वाढून 8,500 झाला आहे.
श्रीमंतांच्या शहरातच समस्या
न्यूयॉर्क या शहरात 50 लाख डॉलर्स (सुमारे 36 कोटी रुपये) किंवा त्याहून अधिक मालमत्ता असलेले 1.20 लाख लोक राहतात. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. तरीही हे शहर भूकेच्या समस्येपासून वाचू शकलेले नाही. महामारीदरम्यान न्यूयॉर्क फूड बँकेने 7.7 कोटी खाद्यपाकिटे वाटली आहेत. हे प्रमाण कुठल्याही अन्य वर्षाच्या तुलनेत 70 टक्क्यांनी अधिक आहे. कृष्णवर्णीय समुदायाच्या लोकांची स्थिती अधिकच खराब आहे.
कम्युनिटी फ्रीज
अन्नसंकटाला सामोरे जाण्यासाठी अमेरिकेत लोक आता परस्परांची मदत करत आहेत. शासकीय मदतीत विलंब होत असल्याने लोकांना हे पाऊल उचलावे लागले आहे. अनेक ठिकाणी लोकांनी कम्युनिटी फ्रीज बसविले आहेत. अन्नापासून वंचित लोक या फ्रीजमधून मोफत अन्न प्राप्त करू शकतात. एका फ्रीजची जबाबदारी दोन जणांना सोपविण्यात आली आहे. याचबरोबर समाजमाध्यमांद्वारेही भुकेल्या लोकांची मदत केली जात आहेत.









