कर्नाटकात एवाय 4.2 व्हेरियंटचा फैलाव झाल्याने पुरेशी सतर्कता बाळगण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. दिवाळी तोंडावर असून कोरोना नियमावली पाळायची गरज आहे. दुसरीकडे सिंदगी, हानगल विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार संपतो आहे. नेत्यांनी जोरदार प्रचारावर भर दिलाय.
कर्नाटकात कोरोना महामारीचा फैलाव सध्या आटोक्मयात आहे. मात्र, विविध देशांना त्रस्त करणाऱया एवाय 4.2 व्हेरियंट कर्नाटकातही आढळून आला आहे. 4.2 चे सात रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. जर नव्या व्हेरियंटचा फैलाव वाढला तर पुन्हा लॉकडाऊनचा विचार होणार आहे. ब्रिटन, रशियासह काही देशांत या नव्या प्रकाराचा प्रादुर्भाव जोरदारपणे सुरू आहे. कर्नाटकात महामारी आटोक्मयात असल्यामुळे शाळा-महाविद्यालये पूर्ण प्रमाणात सुरू करण्यात आली आहेत. सध्या तरी कोरोनाच्या नव्या प्रकाराची भीती बाळगण्याची गरज नाही. कोरोनाचे वेगवेगळे अवतार रोखता येणार नाहीत. मात्र, ते नियंत्रणात ठेवता येणार आहेत. म्हणून नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केले आहे. असे आवाहन करतानाच सणासुदीत कोणीही गाफील राहू नये. नियमावलींचे काटेकोर पालन करावे, असे सांगण्यासही ते विसरलेले नाहीत.
एवाय 4.2 चा कोरोनाचा नवा अवतार त्रासदायक ठरणार का? याविषयी संशोधन सुरू आहे. कोरोना महामारी सध्या आटोक्मयात आहे, पण ती पूर्णपणे संपलेली नाही. यापुढेही त्याचे नवनवे अवतार येत राहणार आहेत. सध्या तरी हे अवतार रोखता येणार नाहीत. मात्र, मास्क, सनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर याचे काटेकोर पालन करणे यापुढेही नव्या व्हेरियंटकडे पाहता आवश्यक ठरणार आहे. सरकारनेही लसीकरणाचा वेग वाढवला आहे. पूर्ण प्रमाणात लसीकरण करणे हा यावरचा मोठा उपाय आहे. एवाय 4.2 हा अवतार जुनाच आहे. दुसऱया लाटेत त्रासदायक ठरलेल्या डेल्टा व्हायरसचा उपप्रकार आहे. डेल्टाचा फैलाव 60 टक्क्मयाने होत होता. याचा वेग 10 टक्के आहे. त्यामुळे सध्या तरी कोणी घाबरू नये, असे आवाहन सरकारने केले आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येणार, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला होता. ऑक्टोबरचा महिना संपत आला असून नोव्हेंबरला सुरुवात होणार आहे. पुढचा महिना मोठा सण घेऊन आला आहे.
कोरोनाच्या तिसऱया लाटेची शक्मयता अद्याप मावळलेली नाही. दिवाळीत प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे पालन केले नाही तर आपली मनमानी वागणूक तिसऱया लाटेला कारणीभूत ठरणार आहे. पहिल्या व दुसऱया लाटेत अनेकांना जीव गमवावे लागले. प्रत्येकाचे कोणी ना कोणी तरी प्रियजन कोरोनाने हिरावून घेतले. आज असणारा उद्या दिवंगत झाल्याचा धक्का लोक अजूनही विसरलेले नाहीत. तिसरी लाट कधी येणार, हे निश्चित नसले तरी तिसऱया लाटेत जिवीतहानी अत्यल्प असेल, असे तज्ञांचे मत आहे. कर्नाटकातील तज्ञ समितीत असणाऱया बहुतेक तज्ञांचे असेच मत आहे. दिवाळीत उत्साहाच्या भरात कोरोनाच्या संकटाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही.
एकीकडे कोरोनाची भीती अजून गेलेली नाही दुसरीकडे महागाईने सर्वसामान्य व गरीबांचे जगणे मुश्कील झाले आहे. दिवाळी म्हटली की खाद्यतेलाचा वापर हा आलाच. तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ सुरूच आहे. किमान खाद्यतेलाचे दर आटोक्मयात आणण्यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारीपासून आतापर्यंत सहावेळा आयात कर कमी करूनही तेलाचे दर प्रत्यक्षात कमी झालेले नाहीत. सणासुदीत साठेबाजी वाढणार आहे. साठेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकारला पावले उचलावी लागणार आहेत. खाद्यतेलांचा साठा किती करावा? याची मर्यादा ठरविण्यात आली आहे. साठेबाजी वाढून कृत्रिम टंचाई निर्माण करून दरवाढ तशीच कायम ठेवता येते. सर्वसामान्य नागरिक महागाईने होरपळून निघाला आहे. केंद्र सरकारने दरवाढ कमी करण्यासाठी आपल्या वाटय़ाचा कर सोडून दिला तरी प्रत्यक्षात महागाई कमी का होत नाही, हा प्रश्न आहे.
कोरोना, महागाई आदींच्या मध्ये सिंदगी व हानगल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेस-निजद नेत्यांमधील टीकेने हीन पातळी ओलांडली आहे. तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर चिखलफेक करीत या निवडणुकीत आपल्याच पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी धडपड करताना दिसत आहेत. निजदने दोन्ही मतदारसंघात मुस्लीम उमेदवार दिला आहे. भाजपला मदत करण्यासाठीच कुमारस्वामी यांनी ही खेळी केल्याचा उघड आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. निवडणूक प्रचारात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व कुमारस्वामी यांच्यात जोरदार कलगीतुरा सुरू आहे. परिणामी हे नेते एकेरी उल्लेखांवर उतरले आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना किमान हानगलची जागा जिंकणे अनिवार्य ठरणार आहे. कारण तो त्यांचा स्वतःचा जिल्हा आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतःच्या जिल्हय़ातील मतदारसंघावर विजय मिळविला तरच त्यांना स्वतःला सिद्ध करता येणार आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा हेही निवडणूक प्रचारात उतरले आहेत. खरी लढत भाजप-काँग्रेसमध्येच होणार आहे. या दोन्ही मतदारसंघात निजद प्रभावहीन ठरला आहे. या दोन्ही पोटनिवडणुकीत जात हा मुद्दा प्रमुख ठरतो आहे. कुमारस्वामी यांच्या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने माजी मंत्री जमीर अहमद यांना पुढे केले आहे. अहमद आणि कुमारस्वामी एकेकाळचे जीवलग मित्र पण सध्या ते एकमेकांचे कट्टर शत्रू बनलेत. विधानसभेच्या प्रांगणात आपल्या मित्राला मार्शलने प्रवेश नाकारला म्हणून इर्षेने त्याला आमदार करूनच येथे आणतो, अशी शपथ घेऊन कुमारस्वामी यांनी निवडून आणण्यासाठी दिवसरात्र एक केली होती. अशी घट्ट मैत्री असणारे हे दोन नेते एकमेकांसमोर उभे ठाकलेत. ‘जास्त बडबड करू नका, तुमची सगळी कुंडलीच माझ्याजवळ आहे. गरज पडली तर ती जनतेसमोर मांडतो’ अशी धमकीच जमीर अहमद यांनी कुमारस्वामी यांना दिली आहे. एकेकाळचे जीवलग मित्र पक्षीय राजकारणात एकमेकांसमोर कसे उभे ठाकले आहेत, हे पहायला मिळते आहे.








