जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून पालिका प्रशासनाला दिल्या नियमबद्ध सूचना
प्रतिनिधी/ सातारा
जगात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. कोरोनामुळे किंवा कोरोना विषाणू संशयास्पद कोणाचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या मुतदेहाची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. यासाठी सातारा नगरपालिकेस काही सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्राद्वारे आज सकाळी दिल्या आहेत. दुसऱया एका पत्राद्वारे त्यांनी कृष्णा नदी तीरावरील संगम माहुली स्मशानभूमीत विल्हेवाट लावण्यासाठी निश्चित केल्याचे उल्लेख केले असल्याचे समजते.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा पालिका प्रशासनाला आज सकाळी दोन आदेशपर पत्र दिली आहेत. त्यामध्ये म्हटले आहे, की ज्या अर्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांमध्ये कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळून येत आहेत. मागील आठवडय़ात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूची अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधक उपाययोजना जिल्हास्तरावर आखण्यात आलेल्या आहेत. तथापि, दुर्दैवाने संशयित अथवा संसर्गाने बाधित असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करणे गरजेचे झाले आहे. त्यार्थी नगरपालिका क्षेत्रात कोव्हिडं 19 या विषाणूने मृत पावलेल्या रुग्णाची विल्हेवाट लावण्याकरता पुढील सूचना दिल्या आहेत. कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून थेट स्मशानभूमीत आणला जाईल. यावेळी मृतदेह ज्या रुग्णवाहिकेतून आणला जाईल त्यासोबत असलेले आरोग्य विभागाचे कर्मचारी विहित पद्धतीने मृतदेह स्मशानभूमीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱयांकडे सुपूर्द करतील. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह विशिष्ट अशा बॅगेत आच्छादित करून आणलेला असेल. दहन किंवा दफन करण्यापूर्वी नातेवाईकाना शेवटचे मुख दर्शन घेण्यासाठी पीपीइ परिधान केलेल्या व्यक्तीकडून योग्य ती खबरदारी घेऊन बॅगेची चैन उघडून नातेवाईकांना किमान पाच फुटांपेक्षा जास्त अंतरावरून दर्शन घेता येईल.
विधी करताना मृतदेहाला स्पर्श न करता सर्व विधी करण्याची अनुमती देता येईल. स्मशानभूमीत गर्दी होणार नाही याची दक्षता पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी घेणे आवश्यक आहे. उपस्थित नातेवाईकांना एकमेकांपासून दूर राहून म्हणजेच किमान सामाजिक अंतर ठेवून अंत्यविधी उपस्थित राहता येईल. स्मशानभूमीत कार्यरत असलेले पालिकेचे कर्मचारी अथवा खासगी संस्थेचे कर्मचारी यांनी पीपीइ वापरणे बंधनकारक आहे. यासाठी आवश्यक पीपीइ किट पालिकाकडून उपलब्ध करून ठेवणे आवश्यक आहे. योग्य वेळी संबंधिताना देणे बंधनकारक आहे. वापरले गेलेले किट हवाबंद थैलीत बंद करून नजीकच्या शासकीय रुग्णालयाकडून विहित पध्दतीने विल्हेवाट लावावी, पालिका हद्दीत विविध समाजाच्या स्मशानभूमी असतात त्यांच्या रूढी पंरपरेनुसार मृतदेहाची विल्हेवाट लावणे आवश्यक असते. ज्या समाजात मृतदेह दफन करणे आवश्यक असते. त्यांच्या देखील नातेवाईकांना शक्यतो दहन करण्यासाठी विनंती करावी,अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यानंतर नातेवाईकांनी हात निर्जंतुक करणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिकेने सॅनिटायझर उपलब्ध करावे, मृतदेह हाताळणाऱया सर्व कर्मचाऱयांनी वापरलेले पीपीइ किट योग्य प्रकारे हवा बंद करून निर्जंतुक करणासाठी स्वतंत्र वाहनाने हॉस्पिटलमध्ये पाठवून द्यावे, व स्वतःचे हात पाय निर्जंतुक करून घ्यावे,असे नमूद केले आहे. याच बरोबर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दुसरे पत्र काढून मृत्यू पावलेल्याची विल्हेवाट लावण्यासाठी कृष्णा नदी पात्रालगतच्या संगम माहुली स्मशानभूमीचा वापर करावा असे सूचित केले आहे.








