मवारी राज्यभरातून 28 रुग्णांची भर : रेसिडेन्सी, हॉटेल्समध्ये 1034 जण क्वारंटाईन : आयसोलेशन वॉर्डातील रुग्णांची संख्या16
प्रतिनिधी / पणजी
गोव्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता पाचशेच्या पार गेला असून तो 507 वर पोहोचला आहे. आतापर्यंत बरे झालेले 85 रुग्ण धरून एकूण कोरोना रुग्णांची संख्या 592 इतकी झाली असून ती सहाशेच्या घरात गेली आहे. काल सोमवारी 28 नवीन रुग्ण पॉझिटीव्ह सापडले असून 11 जण बरे होऊन घरी परतले आहेत.
आरोग्य खात्याने सदर आकडेवारी दिली असून अनेकांचे अहवाल अद्याप यायचे असल्याने कोरोनाबाधितांची संख्या आणखी वाढणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आयसोलेशन वॉर्डातील रुग्णांची संख्या आता 16
सोमवारी गोव्यात आलेल्या 162 आंतरराष्ट्रीय प्रवाशांना तसेच 20 राष्ट्रीय प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून 216 जणांना फॅसिलिटी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोना संशयित म्हणून काल 10 रुग्णंना दाखल करून त्याची रवानगी आयसोलेशन वॉर्डात करण्यात आली आहे. तेथील वॉर्डातील एकूण रुग्णांची संख्या आता 16 झाली आहे.
रेसिडेन्सी, हॉटेल्समध्ये 1034 जण क्वारंटाईन
गोव्यातील विविध रेसिडेन्सी, हॉटेल्समध्ये क्वारंटाईन करून ठेवण्यात आलेल्यांची संख्या 1034 झाली असून एकटय़ा मांगोलहिल भागात आतापर्यंत 271 कोरोना बांधित आहेत. तेथून इतरत्र संक्रमित झोले कोरोना रुग्ण 160 असून रस्ता, विमान, रेल्वेमार्गाने आलेले 68 जण कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत.
वास्को, मोर्ले, चिंबलमध्ये रुग्णसंख्या अधिक
राय, मडगाव, बेती, कुडतरी येथून प्रत्येकी एक कोरोना बाधित सापडला असून वास्को आणि मोर्ले भागात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. न्यू वाडे-वास्को 12, मोर्ले 17, बायणा-वास्को 24, चिंबल 13, सडा-वास्को 17 अशी विविध ठिकाणची रुग्णांची आकडेवारी आरोग्य खात्याने दिली आहे.
गेल्या काही दिवसापासून प्रतिदिन सरासरी 20 ते 30 नवीन कोरोना रुग्ण सापडत असून त्या हिशोबाने आगामी 15 दिवसात म्हणजे जून महिना संपेपर्यंत गोव्यातील कोरोना रुग्णांची संख्या 4 आकडी म्हणजे 1000 पर्यंतचा पल्ला गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता कमी असून वाढण्याचे प्रमाण जास्त झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जनतेमध्ये चिंता वाढत असून अनेक पंचायती आपापल्या भागात लॉकडाऊन करण्याचा विचार करीत आहेत. काही पंचायतीनी अपापल्या क्षेत्रात लॉकडाऊन सुरू केले असून पंचायत खाते आणि सरकार त्या पंचायतीना आडकाठी आण असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ज्या पंचायतीनी लॉकडाऊन केले त्यांना ते मागे घेण्यासाठी सरकारचा दबाव वाढत असल्याचे सांगण्यात आले.
पंचायतींनी लॉकडाऊन करु नये, तसे त्या करु शकत नाही : मुख्यमंत्री
पंचायतीनी लॉकडाऊन करू नये, तसे त्या करू शकत नाहीत. त्यांना तसा अधिकारही नाही असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रकट केले आहे. लोक वैयक्तिक पातळीवर स्वतःपुरते लॉकडाऊन करू शकतात. स्वतःला गर्दीपासून लांब ठेवू शकतात. परंतु पंचायतीना मात्र तसे लॉकडाऊन करता येणार नाही. पंचायती हा सरकारचाच एक भाग आहे. सरकारने अजून लॉकडाऊनचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. लोकांनी, पंचायतीनी अफवा पिकवू, पसरवू नयेत असेही डॉ. सावंत म्हणाले.
गोव्यात 15 जून 2020 पर्यंत कोरोनाबाधित 592
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 85
उपचार घेणारे रुग्ण 507









